वसई: वसई विरार शहरातील समुद्र किनारी रील तयार करण्यासाठी अतिहौशी पर्यटकांकडून वाहने बेदरकारपणे चालवित स्टंटबाजी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकताच नालासोपारा पश्चिमेच्या कळंब समुद्र किनारी एक रिक्षाचालक जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रिक्षा समुद्र किनारी गोल गोल फिरवतानाचा, व्हिडीओ शूट करत होता, मात्र या स्टंट मध्ये चक्क रिक्षाच पलटी झाली. सुदैवाने यात रिक्षाचालकाला कोणतीही इजा झाली नाही.
वसई विरार शहराच्या पश्चिमेच्या भागाला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून भुईगाव, सुरुची, कळंब, राजोडी, अर्नाळा, रानगाव,नवापूर या भागातील समुद्र किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.मात्र काही अतिहौशी पर्यटक हे समुद्र किनारी सोबत आणलेले वाहन घेऊन येत असतात. रील तयार करण्याच्या नादात काही जण भरधाव वेगाने वाहने चालवून जीवघेणी स्टंटबाजीचे प्रकार ही समोर येत आहेत.
नुकताच नालासोपारा पश्चिमेच्या भागातील कळंब समुद्रकिनारी एक रिक्षा चालकाने ‘रील’ तयार करण्यासाठी भरधाव वेगाने रिक्षाचालवित स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र असे जीवघेणे स्टंट अन्य पर्यटकाच्या जीवावर ही बेतू शकतात, त्यामुळे पोलिसांनी अशा रिलस्टारांना आवरं घालावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
स्टंटबाजीच्या नादात वाहने पाण्यात
वसई विरार शहरातील समुद्र किनाऱ्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेताच वाहने समुद्र किनाऱ्याच्या भागात घेऊन जात असतात. अनेकदा वाहनांची चाकं ही वाळूच्या दलदलीत रुतून बसतात. यामुळे चारचाकी वाहने पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.
गाडीची धडक लागून अपघाताचा धोका.
स्टंटबाजी करण्याच्या निमित्ताने भरधाव वेगात किनाऱ्यावर गाड्या चालविल्या जातात. सकाळच्या वेळी आणि विशेषतः सायंकाळच्या सुमारास पर्यटकांची गर्दी अधिक असते. लहान मुलेही या भागात खेळत असतात अशा वेळी जर चुकून गाडीची धडक लागून अपघात होण्याची शक्यता असल्याचे पर्यटकांनी सांगितले आहे. तर काही वेळा गाडी चालक नेमक्या कोणत्या दिशेने गाडी घेऊन जाईल याचा ही काही नेम नसल्याने पुढे मागे होण्याच्या नादात ही पर्यटकाचा अपघात होण्याची शक्यता आहे.
