वसई:- वसई पूर्वेच्या भागातून कामण-बापाणे रस्ता तयार करताना कामण नदीवर पूल बांधणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि महापालिका अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे स्थानिक नागरिकांवर पुराचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे. या पुलाचे काम करताना नदीच्या वरच्या बाजूला टाकलेला दगड-मातीचा मोठा बांध न काढल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून शेजारील खिंडीपाडा व अन्य भागात घुसण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वसई पूर्वेच्या भागात कामण ते बापाणे रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम करताना खिंडीपाडा भागातून जाणाऱ्या कामण नदीवर पूल तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम करत असताना ठेकेदाराने नदीच्या पात्रात वरच्या बाजूस दगड आणि मातीचा एक मोठा तात्पुरता बांध घातला होता. साधारण वीस-पंचवीस दिवसांपूर्वी पुलाच्या स्लॅबखालील मुंढे (सपोर्ट) काढण्यात आले. नियमानुसार, हे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात टाकलेला तो संपूर्ण बांध आणि आजूबाजूला केलेली मातीची भरणी तातडीने काढून नदीचा प्रवाह मोकळा करणे आवश्यक होते.
“स्लॅबचे काम होऊन २०-२५ दिवस उलटले, तरीही ठेकेदाराने नदीतील भरणी आणि बांध हटवला नाही. तसेच महापालिकेच्या संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भेट देऊन काम व्यवस्थित झाले आहे की नाही, याची कोणतीही दक्षता घेतली नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते केदारनाथ म्हात्रे यांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून नदीला पूर आल्यास या बांधामुळे पाण्याचा प्रवाह अडवला जाणार आहे. हे अडलेले पाणी थेट बाजूलाच असलेल्या खिंडीपाडा व आजूबाजूच्या भागात घुसण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे असे ही त्यांनी सांगितले.जर पूर आला तर आजूबाजूच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती हीस्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. नदीपात्रातील तो धोकादायक बांध आणि मातीची भरणी युद्धपातळीवर हटवण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
महापालिकेकडून ही करण्यात आलेला मातीभराव काढून टाकण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे.
