वसई: वसई विरार भागात विविध ठिकाणी कांदळवनांची कत्तल करून अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. या अतिक्रमण रोखण्यासाठी आता वसईच्या महसुल विभागाने पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत २१ ठिकाणी कांदळवनांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी ११ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसई विरार मध्ये खाडी किनाऱ्यालगत, पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे.या कांदळवनांमुळे किनाऱ्यावरील पाण्याचा प्रवाह रोखणे, जमिनीची होणारी धूप थांबविणे, सुनामी, चक्रीवादळ आणि पुरापासून संरक्षण करणे, समुद्राचे प्रदूषण कमी करणे, समुद्रातील मत्स्य प्रजातींची जैविक साखळी अबाधित ठेवणे यासाठी ही कांदळवने अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून विविध ठिकाणच्या भागात कांदळवनांची बेसुमार कत्तल होऊ लागली आहे. काही ठिकाणी त्यावर मोठ्या प्रमाणात माती भराव करून त्यावर चाळी बांधणे, बेकायदेशीर पार्किंग करणे, अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत.
त्यामुळे हळूहळू वसई विरार मधील कांदळवन क्षेत्र कमी होऊ लागले आहे. याचा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.कांदळवन नष्ट झाल्याने आता समुद्राच्या भरतीचे पाणी देखील काही ठिकाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.कांदळवनांच्या वाढत्या कत्तली बाबत वसईतील पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी आवाज उठवून ही बाब महसुल विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांच्या वाढत्या तक्रार नंतर पुन्हा एकदा वसईचा महसुल विभाग सक्रिय झाला आहे. ज्या भागातून तक्रारी येत आहेत अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. यात आतापर्यंत २१ ठिकाणी कांदळवनांची कत्तल, अतिक्रमण झाल्याने आढळून आले असून त्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी दिले होते. त्यात आता ११ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वसईच्या मालोंडे २, विरार मारंबळपाडा ५, उमेळा १, जूचंद्र २, राजावळीं १ या ठिकाणांचा समावेश आहे. अन्य ठिकाणी ही लवकरच कारवाई केली जाईल असे महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कांदळवनांच्या कत्तल व अतिक्रमण याबाबत तक्रार आल्या नंतर तातडीने त्याची पाहणी केली जाते. त्यात दोषी आढळून आल्यास त्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. आताच २१ प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची कारवाई सुरू आहे.- शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी वसई.
कांदळवनांचे संवर्धन गरजेचे
पर्यावरणाच्या व किनाऱ्यापट्टीच्या दृष्टीने अतिशय कांदळवने अधिक महत्वाची आहेत. वसईच्या भागातही किनारपट्टी व खाडीच्या भागात मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. परंतु त्यावर होणारे अतिक्रमण व कत्तल यामुळे ही कांदळवने ही धोक्यात सापडू लागली आहेत. त्या कांदळवनांचे ही संवर्धन करण्याची गरज आहे. कांदळवन कत्तल करणारे व त्यावर मातीभराव टाकून अतिक्रमण करणाऱ्यावर सातत्याने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जेट्टीच्या रस्त्यासाठी कांदळवन कत्तलप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
विरारच्या मारंबळपाडा परिसरात जुन्या जेट्टीपासून ते नवीन जेट्टी पर्यंत नवीन रस्ता तयार करताना मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल करण्यात आली होती. याची कांदळवन समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर केला होता त्यानुसार आता वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदारांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राडारोड्यावर पालिकेचे नियंत्रण हवे
वसई विरार शहरात बांधकामाचा निघणारा राडारोड्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा राडारोडा गौण खनिज मध्ये येत नसल्याने त्यावर महसूल विभागाला कारवाई करता येत नाही. त्यामुळे कांदळवन क्षेत्रात व अन्य भागात राडारोडा टाकला जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने प्रयत्न करायला हवे असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे