वसई : वसईतील चावी विक्रेत्याला मारहाण केल्याच्या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चावी विक्रेत्याला नुकसानभरपाई म्हणून ३ लाख रुपये देण्याचे आदेश आयोगाने पोलीस आयुक्तांना दिले आहे. पोलिसांच्या दादागिरीवरही आयोगाने कडक ताशेरे ओढले असून याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मोह्ममद अली अहमद अली अन्सारी (३५) यांचे वसईत चावी बनविण्याचे दुकान आहे. १६ मे रोजी अन्सारी यांच्या दुकानात एक इसर चावी बनविण्यासाठी आला होता. दोन चावी बनविण्याचे ८० रुपये झाले होते. मात्र त्याने केवळ ६० रुपये दिले. ठरलेल्या रकमेपैकी २० रुपये कमी दिल्याने अन्सारी आणि त्या ग्राहकात वाद झाला. शेवटी प्रकरण माणिकपूर पोलीस ठाण्यात गेले. तेथे असलेले पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांनी फिर्यादी मोह्मद अन्सारी यांच्या मारहाण केली आणि त्यांच्या नाकावर जोराद ठोसा मारला. त्यामुळे अन्सारी यांचे नाक फ्रॅक्चर झाले होते. हेही वाचा.बोईसरमध्ये ठाकूर, पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई या घटनेची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना आयोगापुढे हजर राहण्यास सांगितले होते. संपूर्ण घटनेची महिती घेतल्यानंतर आयोगाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले. काहीही चूक नसताना चावी विक्रेत्या मोहम्मद अन्सारी याला मारहाण केल्याने त्याला नुकसान भरपाई म्हणून ३ लाख रुपये द्यावेत असे निर्देश आयोगाने दिले. सदर घटना गंभीर असून पोलिसांची कृती निंदनीय आहे. पोलिसांनी जनतेशी सौहार्दाने वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणी पीडित चावी विक्रेत्याला ३ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत - के.के. तातेड, अध्यक्ष, राज्य मानवाधिकार आयोग हेही वाचा.वसई विरार महापालिकेचे अडीचशे कोटींचे नवीन मुख्यालय; ४ वर्षानंतर मुख्यालयाचे उदघाटन पोलिसांच्या या दादागिरीमुळे वसईत संतापाची लाट उसळली होती. फिर्यादी अन्सारी यांना जबर दुखापत होऊन १० दिवस उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या प्रकरणी नागरिकांच्या आंदोलनानंतर मारहाण करणार्या पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांच्या विरोधात ३२५, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलगरे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.