वसई: पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई परिसरात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामांनी वेग घेतला आहे. शेतकरी सध्या शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आणण्यासोबतच, आगामी चार महिन्यांसाठी जनावरांच्या सुक्या चाऱ्याची सोय करण्यात व्यस्त आहेत. विशेषतः दुग्धव्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना पावसाळ्यात जनावरांच्या चारा-पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणावर सुका चारा साठवण्याची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

​आगामी पावसाळ्याची सोय म्हणून डेअरी चालक आणि पशुपालकांकडून सुक्या गवताचे भारे ट्रक, टेम्पो तसेच पारंपरिक बैलगाड्यांच्या माध्यमातून गोदाम व गोठ्यामध्ये जमा केले जात आहेत. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून वसई-विरार तसेच मुंबईच्या दिशेने सुका चारा वाहून नेणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. विशेषतः आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात वाहतुकीसाठी ट्रक आणि इतर अवजड वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असले तरी, वसईच्या काही ग्रामीण भागांत आजही पारंपरिक बैलगाड्यांमधून चारा वाहून नेण्याची पद्धत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावरून एकापाठोपाठ एक, एका रांगेत गवताचे भारे भरून जाणाऱ्या बैलगाड्या आणि त्यांचे गाडीवान हे दृश्य सध्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.

​बालगोपाळांसाठी ठरतेय कुतूहलाचा विषय

बदलत्या काळानुसार वसई परिसरात आता बैलगाड्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. अशा काळात महामार्गावरून जाणाऱ्या या बैलगाड्या गावाशेजारून जाताना लहान मुले अत्यंत कुतूहलाने आणि आनंदाने पाहताना दिसत आहेत. विस्मरणात चाललेल्या या ग्रामीण संस्कृतीचे विलोभनीय चित्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर नागरिकांनाही सुखावून जात आहे.