वसई:- वसई तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. तालुक्यातील ३१ रिक्त पदांसाठीची आरक्षण सोडत सोमवारी तहसीलदार कार्यालयातील सभागृहात तहसीलदार दीपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाल पार पडली. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते, नायब तहसीलदार शशिकांत नाचण आणि गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे यांच्यासह इतर महसूल अधिकारी उपस्थित होते.

​वसई तालुक्यामध्ये महसूल सेवकांची एकूण ३८ पदे मंजूर असून, त्यापैकी ७ पदे भरलेली आहेत. उर्वरित ३१ रिक्त पदांसाठी शासन निर्णयानुसार पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये पेसा क्षेत्रातील ३ तर नॉन-पेसा क्षेत्रातील २८ पदांचा समावेश आहे. पेसा क्षेत्रातून कामण आणि पारोळ हे साजा अनुसूचित जमातीसाठी, तर खानिवडे हे साजा खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे. ​नॉन-पेसा क्षेत्रातील सोडतीत अनुसूचित जमातीसाठी गोखिवरे, विमुक्त जाती (अ) साठी विरार-१, भटक्या जमाती (ब) साठी कौलार, भटक्या जमाती (क) साठी नवाळे, भटक्या जमाती (ड) साठी मुळगाव आणि विशेष मागास प्रवर्गासाठी कोफराड या सजांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहिसर, उमेळमान व वटार या ३ सजा, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी सांडोर, माणिकपूर व वालीव हे ३ साजा आरक्षित झाले आहेत. इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या वाट्याला आलेल्या ७ सजांमध्ये गिरिज, जूचंद्र, आगाशी-१, निळेमोरे, उमराळे, धोवली व नारिंगी यांचा समावेश आहे. याशिवाय विरार-२, पेल्हार, चंदनसार, गास, आचोळे, बोळींज, वडवली, दिवाणमान आणि ससुनवघर या ९ सजा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

​या सोडतीत महिलांसाठी विशेष आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यात माणिकपूर (सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग), चंदनसार, दिवाणमान व पेल्हार (खुला प्रवर्ग), वटार (आर्थिक दुर्बल घटक) तसेच उमराळे व आगाशी-१ (इतर मागास वर्ग) या सजा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षण निश्चितीमुळे पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले असून, तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार आहे.