वसई:- २८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या महसूल सेवकांच्या (कोतवाल) आरक्षण सोडतीत काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी वसई तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात पुन्हा नव्याने आरक्षण सोडत घेण्यात आली आहे.तहसीलदार दीपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सहायक प्रशासकीय अधिकारी युवराज शिवगण आणि मंडळ अधिकारी किशोर देशमुख यांच्यासह इतर महसूल अधिकारी उपस्थित होते. या नव्या सोडतीमुळे तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेला आता पुन्हा वेग आला आहे.
वसई तालुक्यामध्ये महसूल सेवकांची एकूण ३८ मंजूर पदे असून, त्यापैकी ७ पदे आधीच भरलेली आहेत. उर्वरित ३१ रिक्त पदांसाठी शासन निर्णयानुसार पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये पेसा क्षेत्रातील ४, तर नॉन-पेसा क्षेत्रातील २७ पदांचा समावेश आहे. पेसा क्षेत्रातून कामण आणि पारोळ हे साजा ‘अनुसूचित जमाती’साठी, तर खानिवडे हे साजा ‘अराखीव’ म्हणून निश्चित करण्यात आले आहे; तसेच या क्षेत्रातील एक पद पूर्वीच भरलेले आहे.
नॉन-पेसा क्षेत्रातील २७ जागांच्या सोडतीत विविध प्रवर्गांना आरक्षण देण्यात आले आहे. यात अनुसूचित जमातीसाठी गोखिवरे, विमुक्त जाती (अ) साठी पेल्हार, भटक्या जमाती (ब) साठी बोळींज, भटक्या जमाती (क) साठी कौलार, भटक्या जमाती (ड) साठी वटार, आणि विशेष मागास प्रवर्गासाठी धोवली या साजांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. याशिवाय, आर्थिक दुर्बल घटकांसाठी गिरीज, चंदनसार व नारिंगी हे ३ साजा, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी विरार १, कोफराड व वालीव हे ३ साजा आरक्षित झाले आहेत. इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या वाट्याला आलेल्या ६ साजांमध्ये आचोळे, नवाळे, वडवली, ससूनवघर, दिवाणमान व माणिकपूर यांचा समावेश आहे.
तसेच विरार २, दहिसर, निळेमोरे, आगाशी १, उमराळे, मूळगाव, जूचंद्र, सांडोर, उमेळमन आणि गास हे १० साजा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या सोडतीतील त्रुटी दूर करून नव्याने पार पडलेल्या या प्रक्रियेमुळे सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले असून, आता जाहीर झालेल्या आरक्षणांनुसारच पुढील भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि यामुळे तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी माहिती तहसीलदार दीपक गायकवाड यांनी दिली.
महिलांसाठी आरक्षित साजा
या आरक्षण सोडतीत महिलांसाठीही विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामध्ये वालीव , विरार २, उमराळे, सांडोर (खुला प्रवर्ग), चंदनसार (आर्थिक दुर्बल घटक) तसेच आचोळे आणि वडवली (इतर मागास वर्ग) हे साजा महिला उमेदवारांसाठी आरक्षित आहेत तलाठी साजा परिसरातील स्थानिक व्यक्तीचीच ‘कोतवाल’ पदावर नियुक्ती करा महसूल सेवक (कोतवाल) पदासाठीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. ज्या ठिकाणी ज्या वर्गाचे आरक्षण पडले आहे, त्यानुसार नियुक्ती करताना संबंधित तलाठी साजा परिसरातीलच स्थानिक व्यक्तीला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार बळीराम जाधव यांनी केली आहे. स्थानिक व्यक्तीला परिसराच्या भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने आणि सुरळीत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
