वसई: महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वसईत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना अद्यापही केरोसिन वाटप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे याविरोधात लाल बावटा पक्षाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण जगभरात घरगुती तसेच व्यावसायिक वापराचा गॅस आणि इंधन यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांची गरज भागवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकाधारक कुटुंबांना केरोसिन वाटप करण्याचे आदेश दिले होते. पण, वसई तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे गॅस सिलिंडर संपल्यावर नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने (लाल बावटा) जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी सिमा महल्ले, तहसीलदार दीपक गायकवाड आणि वसई अन्नपुरवठा अधिकारी भागवत सोनार यांना निवेदन देत कारवाई न केल्यास १२ मे रोजी ‘चुलपेटवा’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशात अंत्योदय व प्राधान्य गटाला प्राधान्य केरोसिन देण्याचे निर्देश आहेत. पालघर जिल्ह्यात ८४ हजार लिटर आणि वसई तालुक्यात १२ हजार लिटर केरोसिन कोटा मंजूर झाले असले तरी मे २०२६ पर्यंत एकही थेंब वाटप झालेला नाही, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यामुळे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, युद्धकाळात अशा उपेक्षेमुळे दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.

त्यामुळे पुरवठा विभागाने केरोसिन वाटप सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी आणि गैरवापर टाळण्यासाठी निरीक्षण पथके नेमावीत अशी मागणी लाल बावटा पक्षाचे पालघर जिल्हा सह-सेक्रेटरी कॉ. शेरू वाघ यांनी केली आहे.