वसई: सामान्यांना परवडणाऱ्या दरात जमिनीचे पोट हिस्से करता यावेत राज्य शासनाकडून सलोखा योजना राबविण्यात येते. मात्र या योजनेबाबत वसई तालुक्यात फरशी जनजागृती नसल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाकडून दर शुक्रवारी विशेष शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वसई विरार शहरात गेल्या काही काळात विविध प्रकल्प आणि इमारतींच्या बांधकामामुळे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. वसई तालुक्यातील स्थानिक नागरिक अनेकदा वडिलोपार्जित जमीन एखाद्या विकसकाला विकतात किंवा मग त्यावर स्वतः एखादी इमारत उभारतात.

पण, मोठ्या जमिनीच्या तुकड्याचा मालकी हक्क स्पष्ट करणे, कायदेशीर वाटणी करणे आणि सातबारा उताऱ्यावर स्वतंत्र नोंद करणे यासाठी जमिनीचे पोट हिस्से करणे अतिशय गरजेचे झाले आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी आणि नागरिकांना अवघ्या दोनशे रुपयात जमिनीचे पोट हिस्से करता यावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे.

मात्र, वसई तालुक्यात या योजनेंतर्गत एकही अर्ज प्राप्त न झाल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई अमोल बदाडे यांनी दिली. त्यामुळे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या अध्यक्षतेत तहसील कार्यालयात पडलेल्या जनसंवाद दिनी नागरिकांच्या सोयीसाठी सलोखा योजनेची माहिती देणारे विशेष शिबिर सुरू करण्याच्या सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यानुसार दर शुक्रवारी वसई तालुक्यातील गावांमध्ये सलोखा योजनेच्या जनजागृतीसाठी ‘एक गाव’ हे शिबिर सुरू केले जाणार असल्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई अमोल बदाडे यांनी सांगितले. मे महिन्यापासून या शिबिरांना सुरुवात केली जाणार असून ज्या गावात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक वास्तव्यास आहेत त्या भागात प्राधान्याने शिबिरे भरवली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.