वसई:भूमाफिया सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ ‘रंधा’ याला वसईतील २१० गुंठे जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हे शाखा ४ च्या पथकाने अटक केली आहे. वसई न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची वसई पूर्वेच्या मौजे राजावळी परिसरात सर्व्हे नंबर १४६, हिस्सा नंबर ३, सर्व्हे नंबर १४९ हिस्सा नंबर २ येथे २१० गुंठे जागा आहे. भूमाफिया सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ ‘रंधा याने २०२० ते २०२५ या कालावधीत संबंधित जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला.
या जमिनीचा कोणताही मोबदला मूळ जमीन मालकाला न देता, आरोपीने ती जमीन परस्पर विकासकांना विकली. इतकेच नव्हे तर, या जागेवर अनधिकृतपणे चाळींचे बांधकाम करून त्यातील खोल्यांची विक्री करत सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केली.
दरम्यान, तक्रारदाराने आपल्या जमिनीचे पैसे मागितले असता, आरोपी रंधा आणि त्याचा साथीदार अरविंद अलगू सिंह ऊर्फ ‘दारा’ यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३५२, ३५१(२) ३५३ (३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी रंधा याला अटक केली.मंगळवारी आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता, १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
