वसई: वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वसई तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेंतर्गत श्रमदानातून वनराई बंधारे तयार करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शासकीय अधिकारी, आशा सेविका यांच्या सहकार्याने शहरात आतापर्यंत शंभर वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत.

गेल्या काही काळात वसई विरार शहर झपाट्याने बदलत गेले आहे. वाढती लोकसंख्या, कमी होत जाणारे वनक्षेत्र, बेसुमार भूजल उपसा अशा विविध कारणांमुळे शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत संपुष्टात येत आहेत. तर दुसरीकडे सूर्या धरण आणि इतर योजनांमार्फत होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शहरातील पाण्याचे जलस्त्रोत टिकवण्याची गरज निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेंतर्गत वसई तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये झरे, नद्या अशा वाहत्या जलस्त्रोतांच्या ठिकाणी वनराई बंधारे तयार करून पाणी अडविण्यात येत आहेत. त्यामुळे त्या भागात पाण्याची भूगर्भातील पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती वसई, ग्रामपंचायत, आशा सेविका, स्थानिक नागरिक या सर्वांच्या पुढाकाराने हे बंधारे तयार करण्याचा येत आहेत.

वसई तालुक्यात एक महिन्याच्या कालावधीत पोमण, देवकुंडी, भाताणे, खानिवडे, टिवरी, सकवार, उसगाव, मेढे, आडणे, माजीवली अशा विविध ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यात येत आहेत. १५० बंधारे बांधण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत १०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. लोकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद असून हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया वसई पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी घनश्याम पाटील यांनी दिली आहे.

भूजल पाणी पातळीत होणार वाढ

श्रमदानातून वनराई बंधारा बांधल्याने जलस्त्रोतांच्या ठिकाणी मोठा पाणी साठा जमा होतो. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात अडवलेले पाणी जमिनीत जिरते आणि यामुळे पाण्याची पातळी वाढते. याचा फायदा शेती, गोधन, जंगलातील प्राणी व परिसरातील गावकरी यांना होणार आहे. तर हेच साचलेले पाणी जमिनीत जिरत असल्यामुळे विहिरी, बोअरवेल यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

वनराई बंधारे उपक्रम काय?

महाराष्ट्र शासनाचे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी, सुशासन आणण्यासाठी आणि ग्रामीण विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच एक भाग म्हणून वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीतून जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन दिले जात आहे. जेणेकरून गावे आत्मनिर्भर आणि समृद्ध होतील.

वाहत्या झऱ्यांचे पाणी अडवून जमिनीत जिरवल्यास भूजल पातळी वाढून पाणीटंचाई कायमची दूर होऊ शकते. त्यामुळे वसई तालुक्यात वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना हंगामी पिकांसाठी होणार असून त्यांचे उत्पन्न वाढेल. सर्वांनी एकत्र येऊन पाणी अडवण्याची मोहीम राबवल्यास आपण समृद्धीकडे नक्कीच पाऊल टाकू शकू. – छत्तरसिंग राजपूत (गट विकास अधिकारी, पंचायत समिती,वसई )