वसई: ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र प्रायश्चित्त काळाला सुरुवात झाली असून, वसईतील विविध चर्च आणि सामाजिक संस्थांच्या वतीने यंदाही वैचारिक प्रबोधनाची परंपरा जपली जात आहे. उपवास आणि प्रार्थनेसोबतच अध्यात्मिक व सामाजिक विषयांवर आधारित उपवासकालीन व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे.

येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करून देणारा काळ म्हणजे पवित्र प्रायश्चित्त काळ (लेंट). बुधवार, १८ फेब्रुवारीपासून प्रायश्चित्त काळाची सुरुवात झाली आहे. तर राखेचा बुधवार म्हणजे ॲश वेन्सडे ते ईस्टर असे चाळीस दिवस हा पवित्र उपवास व पश्चात्तापाचा काळ सुरू राहतो. या काळात ख्रिस्ती बांधव उपवास, दानधर्म आणि प्रार्थना करून आत्मशुद्धी करतात.

या काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर जीवन विकास मंडळ, प्रबोधन प्रतिष्ठान आणि लोक सेवा मंडळ या संस्थांकडून सामाजिक, वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक विषयांवर आधारित व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे.

यापैकी जीवन विकास मंडळ व चेतना पुस्तकालय यांच्या वतीने ‘स्व. बिशप डॉमनिक आब्रिओ व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान ही व्याख्यानमाला पार पडणार असून या मालेचे पहिले पुष्प रविवार, १ मार्च रोजी नवाळे येथील सन्मा. देगू डाबरे सभागृहात गुंफले जाणार आहे. यामध्ये मॅक्सवेल लोपीस ‘वाचन संस्कृती’वर तर फ्रान्सिस आल्मेडा ‘सामान्य माणसाचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त मर्डेस-वाघोली येथील वेलंकनी माता चर्च हॉलमध्ये डॉ. प्रियंका सचिन चौधरी ‘स्त्रियांचे आरोग्य’ यावर प्रकाश टाकतील. या मालिकेची सांगता २२ मार्च रोजी गोम्स आळी येथील होली ट्रिनिटी चर्च हॉलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ चिन्मय गवाणकर यांच्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सामान्य माणूस’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.

दुसरीकडे, नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मदर वेरोनिका सभागृहात प्रबोधन प्रतिष्ठान आयोजित ‘प्रबोधन व्याख्यानमाला २०२६’ रंगणार असून व्याख्यानमाला आयोजनाचे संस्थेचे हे अकरावे वर्ष आहे.

महिन्यातील चारही रविवारी सकाळी ९.३० वाजता व्याख्यानमाला पार पडणार आहेत. या व्याख्यानमालेत १ मार्च रोजी डॉ. वृषाली राऊत ‘कोविड नंतरचे मानसिक आरोग्य’ यावर मार्गदर्शन करतील. ८ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्त्या डॉम्निका डाबरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरणावर जाहीर परिसंवाद होणार आहे. तर १५ मार्च रोजी सुप्रसिद्ध वक्ते डॉ. संजय कळमकर ‘जगण्याच्या आनंदी वाटा’ उलगडणार आहेत. या मालेचा समारोप २२ मार्च रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावरील व्याख्यानाने होईल.

तर वसईतील लोकसेवा मंडळ आणि बसीन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपवासकालीन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे १२ वे वर्ष असून, मार्च महिन्यातील पहिल्या तीन रविवारी ही व्याख्याने संपन्न होणार आहेत. सांडोर येथील बंगली नाका भागातील स्व. फ्रान्सिस डिसोजा सभागृहात सकाळी १०:०० ते ११:१५ या वेळेत हे कार्यक्रम होतील.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रविवार, १ मार्च रोजी गुंफले जाणार असून ‘विवाह संस्थेपुढील आव्हाने’ या महत्त्वपूर्ण विषयावर वसई धर्मप्रांताचे ज्युडिशियल व्हिकर व चॅन्सलर रेव्ह. फा. डॉ. जॉन फरगोज आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर ८ मार्च रोजी दुसऱ्या पुष्पात पुण्यातील प्रसिद्ध लेखिका व व्याख्यात्या मेघा जरे या ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तर व्याख्यानमालेच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी १५ मार्च रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गव्हाणकर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता सोबत जगताना’ या विषयावर प्रबोधन करणार आहेत. सामाजिक आणि समकालीन विषयांवर आधारित असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.