वसई: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात स्थानिकांच्या पुढाकारातून रविवारी लाँग मार्च काढण्यात आला होता. वाघोली
ते निर्मळ काढण्यात आलेल्या या मोर्चात ३ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी नागरिकांनी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा वळवताच त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. या मारहाणीच्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून मोर्चे आणि आंदोलने करून याविरोधात निषेध नोंदवला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर वसईत महिलांच्या नेतृत्वात वाघोली ते निर्मळ दरम्यान लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पार पडलेल्या या मोर्चात वसई विरारच्या कानाकोपऱ्यातून स्थानिक नागरिक, महिला, तरुण, लहान मुले तसेच सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना, सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा घेतलेला राजीनामा हा आंदोलनकर्त्यांनी मागणीची दखल नसून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने देशातील शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत गरज आहे, असे मत आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी दिली.
तर फक्त राजीनामा पुरेसा नसून दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण करणारे कर्मचारी तसेच नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलायला हवीत, अशी भूमिकाही यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली.
