वसई:- सेवा संकल्प आणि सेवा सेतू अभियानांतर्गत महावितरणकडून वसई मंडळ कार्यालय अंतर्गत ४२१ नवीन घरगुती वीज जोडण्यांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अधिक्षक अभियंता माणिक राठोड यांनी दिली आहे. याशिवाय ग्राहकांच्या विविध तक्रारींचे ही निवारण केले जात आहे.वसई मंडळ कार्यालय अंतर्गत विविध ठिकाणी वीज ग्राहकांना मागेल त्याला सौर कृषी पंप, स्मार्ट योजना, प्रधानमंत्री मोफत सुर्य घर योजना, नावात बदल, नवीन वीज जोडणी याची माहिती देण्यासाठी तात्पुरता स्वरूपात माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे.

या ठिकाणी नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.सोबतच वीज ग्राहकांचे अर्ज स्वीकारले जात आहे.यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचत आहे. या आठवड्यात वसई मंडळ कार्यालय अंतर्गत ४२१ नवीन वीज जोडणी अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दुसरीकडे प्रधानमंत्री मोफत सुर्य घर योजनेसाठी ४४ ,नावात बदल करण्यासाठी २५ अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जाची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.