वसई:- वाढीव वीज बिलाच्या त्रासाला कंटाळून एका वीज ग्राहकाने थेट महावितरण कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. या थरारक प्रकारामुळे महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली. वेळीच उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वसईच्या उमेळमान परिसरातील रहिवासी अजय कुमार त्रिपाठी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी महावितरणतर्फे जुने मीटर बदलून ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात आले होते. त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार, नवीन मीटर बसवल्यापासून त्यांच्या घराचे वीज बिल अचानक वाढले आणि तब्बल १४ हजार रुपयांपेक्षा अधिक आले. ​एवढ्या मोठ्या रकमेचे वीज बिल आल्याने त्रिपाठी यांनी सातत्याने महावितरण कार्यालयात चकरा मारून तक्रार दिली. मात्र, महावितरण प्रशासनाकडून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच कोणताही समाधानकारक तोडगा काढण्यात आला नाही. त्यातच महावितरणने थकीत बिलापोटी त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला.

​वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संतप्त आणि हताश झालेले त्रिपाठी शुक्रवारी दुपारी महावितरण कार्यालयात पोहोचले. त्यांनी सोबत आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच कार्यालयातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांची एकच पळापळ झाली. मात्र, काहींनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्रिपाठी यांना रोखले आणि त्यांच्या हातातील पेट्रोल काढून घेतले.

या घटनेनंतर त्यांना तात्काळ महापालिकेच्या सर डी.एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

​या घटनेनंतर महावितरण प्रशासनाचे धाबे दणाणले, या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तात्काळ त्रिपाठी यांच्या घराचा वीज पुरवठा पूर्ववत केला असून त्यांच्या मीटरची तपासणी सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

महावितरणचे म्हणणे काय ?

​ग्राहकाच्या वाढीव बिलाच्या तक्रारीनंतर जळालेला मीटर बदलून व वीज वापर सारखाच असल्याचे स्पष्ट करूनही, ग्राहकाने स्मार्ट मीटरला विरोध केला. वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकाने दिलेल्या धमकीमुळे महावितरणने तातडीने वीज जोडणी पूर्ववत केली; तरीही ग्राहकाने कार्यालयात येऊन ‘स्मार्ट मीटर नको’ या अट्टाहासापोटी शासकीय निर्णय समजून न घेता स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून ग्राहकाचा जीव वाचवला व रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांना ही माहिती दिली आहे. असे महावितरणने सांगितले आहे.