वसई: वसईत पूर्वेतील भागात रोहित्रात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याच्या रागातून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला आणि सुरक्षारक्षकाला स्थानिक तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई विरार शहरात अलीकडे सतत वीज खंडित होण्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार बुधवारी वसईत पूर्वेतील परिसरात घडला. ३ जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास महावितरणच्या नवघर पूर्व शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले रमेश मुकने व त्यांचे सहकारी निखिल गंगाधर इजरकर रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. रात्री साडेदहाच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोर असलेल्या रामदास नगर येथील दिवाण अपार्टमेंट इमारतीजवळ मोठा स्फोट झाल्याचा आवाज त्यांना आला.

रोहित्र जळाल्याचा संशय आल्याने मुकने आणि इजरकर यांनी तात्काळ तेथे जाऊन पाहिले असता रोहित्राला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान राखून ती आग विझवली आणि दुरुस्तीचे साहित्य आणण्यासाठी ते परत कार्यालयात आले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयाची मुख्य वीजवाहिनी दुरुस्त करत होते.

Read more: वीज पुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

त्याच वेळी, समोरील इमारतीमध्ये राहणारे तीन तरुण महावितरणच्या कार्यालयात आले. “आमच्या इमारतील वीज अजून आली नाही, तुम्हाला दुरुस्ती करण्यासाठी एवढा वेळ लागतो का?” असे म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, तिन्ही आरोपींनी तंत्रज्ञ रमेश मुकने यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

कार्यालयाचे सुरक्षारक्षक प्रकाश पांडुरंग ताडेल l हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आले असता, आरोपींनी त्यांच्या हातातील जड कड्याने ताडेल यांच्या डाव्या कानावर प्रहार केला, ज्यामुळे ते जखमी झाले. या मारहाणीत रमेश मुकने यांच्या मानेलाही दुखापत झाली असून सूज आली आहे.

याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अभिषेक रवी कदम (२५), अक्षय रवी कदम (२४) आणि श्लोक पेंढारे (२५) या तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२१(१), १३२, ३५१(२), ३५२ ३(५) या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास सुकलवाड यांच्याकडून केला जात आहे.