वसई:-पुणे येथील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकारानंतर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मालजीपाडा जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत गावठी दारू सह १६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे.

​मालजीपाडा जंगल परिसरामध्ये हितेंद्र भोला चौधरी आणि नामदेव वाघे हे दोघे अवैध रित्या गावठी दारूची निर्मिती करत असल्याची खात्रीशीर माहिती नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. या गुप्त  माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मालजीपाडा जंगलात छापा टाकला. यावेळी मद्यनिर्मीती करण्यासाठी

हातभट्ट्या लावण्यात आल्याचे आढळून आले. या कारवाईत गावठी दारूची मुख्य भट्टी उद्ध्वस्त करत २८०० लीटर गावठी दारू, ३२४० लीटर गुळाचा वॉश व त्यासाठी लागणारे विविध साहित्य असा एकूण १६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे.

या कारवाईची माहिती मिळताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (क) आणि (फ) अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम, सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार सचिन ओलेकर, सचिन मोहिते, आणि पोलीस अंमलदार चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार, जयवंत खंडवी, अशोक पाटील व पांडुरंग महाले यांनी केली आहे.