वसई: वसई पश्चिमेतील माणिकपूर चौकात एक बांबू अधांतरी ठेवून या बांबूच्या आधारे महावितरणकडून वीजजोडणी दिली असल्याचा प्रकार समोर आला आहे. पावसाळ्यात वाहणाऱ्या वेगाच्या वाऱ्याने बांबू किंवा त्यावर अडकवण्यात आलेली वीजवाहिनी खाली पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच महावितरणने या लोंबकळत्या वीजतारांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
वसई विरार शहरात विजेच्या झटक्याने महावितरणचे कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी जीव गमावल्याच्या सहा ते सात घटना गेल्या दोन महिन्यात समोर आल्या आहेत. मात्र, असे असताना देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजजोडणी देताना गंभीर निष्काळजीपणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. वसई पश्चिमेला माणिकपूर परिसर आहे. या परिसरातील गवणीघर म्हणजे माणिकपूर चौक या भागात असणाऱ्या दुकानाच्या बाजूला असलेला वीजखांबावरुन बांबूचा आधार देऊन वीजपेटीतून नजीकच्या परिसरात वीजजोडणी देण्यात आली आहे.
मात्र, ज्या बांबूच्या आधारे ही जोडणी देण्यात आली आहे, तो रस्त्याच्या कडेला अधांतरी उभा करण्यात आला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पावसाच्या धारा आणि त्याचबरोबर वाहणारा वारा यामुळे या बांबूवर लोंबकळणारी वीजेची तार तुटून खाली पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. तसेच यामुळे नागरिकांच्या जीवावर देखील बेतू शकते, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच हा भाग अतिशय वर्दळीचाअसून अशा ठिकाणी धोकादायक पद्धतीने वीज जोडणी देणे चुकीचे आहे. त्यामुळे महावितरणने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी फ्रँको डिसूझा यांनी केली आहे. याबाबत सहाय्यक अभियंता दिनेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, माणिकपूर चौक येथील भागाची पाहणी करून लोंबकळत्या वीजतारांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
