वसई: शहरात इंधन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हाप्रशासनने कॅन किंवा बाटलीत पेट्रोल आणि डिझेल देण्यास मनाई केली आहे. मात्र, प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत वसईतील माणिकपूर पेट्रोल पंपावर सर्रास प्लास्टिक कॅनमध्ये डिझेलची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओसुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सुद्धा सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. सद्यस्थिती किरकोळ बाजारात पेट्रोलची किंमत १०४ रुपयांवर तर डिझेलची किंमत ९० रुपयांवर पोहोचली आहे.
तसेच मध्यंतरी इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या भीतीने अनेकांनी वसई विरार शहरातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी तासंतास लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यामुळे सलग दोन ते तीन दिवस शहरात इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने पालघर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांना नागरिकांना इंधनाचा नियंत्रित पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच प्लास्टिक कॅन किंवा बाटलीत खुल्या इंधनाची विक्री करू नये, अशाही सूचना दिल्या होता.
तर पुरवठा अधिकाऱ्यांनी देखील नुकतीच पंप चालकांची यासंबंधी बैठक घेतली होती. तसेच इंधनाची काळाबाजारी केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
मात्र, त्यानंतरही वसईत नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिक कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक महिला प्लास्टिकच्या दोन मोठ्या कॅनमध्ये डिझेल भरताना दिसत आहे.
पंप चालकावर यापूर्वीसुद्धा कारवाई
यापूर्वी नालासोपारा येथील धानीवबाग परिसरात रिक्षा चालकांकडून सीएनजी गॅस भरून देण्यासाठी जास्तीचे ३० ते ५० रुपये घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई करत पंप सील केला होता.
