वसई: वसई पश्चिमेतील माणिकपूर ते वसई रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य पदपथ तसेच बसथांब्यावर टाकण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पडून अडणारे हे साहित्य हटवण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वसई पश्चिमेतील माणिकपूर ते वसई रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी पालिकेकडून जलवाहिन्या अंथरण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. अतिशय संथ गतीने करण्यात आलेल्या या कामामुळे नागरिकांना खडबडीत रस्ते, धूळ आणि माती अशा समस्यांचा सामना करावा लागत होता. तसेच खराब रस्त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी लावून धरली होती.
या मागणीची दखल जलवाहिन्या अंथरण्याचे काम पूर्ण होताच खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराकडून खडी, डांबर, दगड, इत्यादी साहित्य पदपथ तसेच बसथांब्यावर टाकण्यात आले होते. तसेच खोदलेल्या रस्त्याच्या कडेला रोडरोलर, लहान ट्रक अशी वाहने उभी करण्यात आली होती. जवळपास महिन्याभराच्या कालावधीत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आणि रस्ता वापरण्यायोग्य बनला.
मात्र, रस्ता दुरुस्त करून झाल्यानंतर रस्त्याच्याकडेला, पदपथ आणि बसथांब्यावर उरलेले बांधकामांचे साहित्य जसे खडी, मोठे दगड आणि मोठमोठी वाहने तशीच पडून होती. यामुळे पदपथावर विखुरलेल्या खडीतून मार्ग काढत पादचाऱ्यांना चालावे लागत होते. तर खडीच्या डोंगराने अर्धा बसथांबा व्यापला असल्यामुळे प्रवाशांना चक्क रस्त्याच्याकडेला उभं राहून तासंतास बसची वाट पाहावी लागत होती. पण, वारंवार तक्रार करून अखेर गेल्या अनेक महिन्यांपासून पडून असलेले साहित्य अखेर कंत्राटदाराने हटविले असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
