वसई: वसई पश्चिमेतील माणिकपूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, दुरुस्तीदरम्यान रस्त्यावर टाकण्यात येणारी खडी, रस्त्यावर उडणारी धूळ व दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. तर चांगल्या स्थितीत असलेला रस्ता खोदून पालिकेने प्रवाशांच्या अडचणीत वाढ केली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वसई रेल्वे स्थानक, उमेळमान, वसई गाव या ठिकाणांना जोडणारा माणिकपूर रस्ता हा अतिशय महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पालिकेकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे. यासाठी आधीचा सपाट रस्त्याचा वरचा थर काढून त्यावर मोठमोठे दगड व खडी टाकण्यात आले आहे. तर रात्रीच्या सुमारास एकाबाजूची वाहतूक बंद करून टप्प्याटप्प्याने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे.

मात्र, या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी व दगडांमुळे दुचाकी चालकांना अतिशय धीम्या गतीने वाहने चालवावी लागत आहेत. तर दुसरीकडे अवजड वाहने किंवा चारचाकी वाहनांचा वेगही मंदावला आहे. यामुळे दिवसभर आणि खासकरून संध्याकाळच्या सुमारास माणिकपूर पेट्रोल पंपापर्यंत असणारी वाहतूक कोंडी आता थेट कृष्ण कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वाहन चालकांना १५ ते २० मिनिटे दररोज वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

वाहतूक कोंडीचा त्रास होत असताना दुसरीकडे खोदलेला रस्त्यामुळे परिसरातील धुळीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह रस्त्याच्या कडेने जाणारे पादचारी तसेच बस थांबल्यावर बसची वाट पाहत उभे राहणाऱ्या प्रवाशांनाही धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दोन ते तीन महिन्यांपूर्वी वायएमसीए मैदानापासून स्टेला पेट्रोल पंपापर्यंत रस्ता खोदला होता. त्यामुळे किमान महिनाभर अशाच त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागले होते. पण, यांना जर पुढच्याही रस्त्याचे काम करायचं होतं. तर हे लोक एकत्र सगळ्याचं कंत्राट का काढत नाही, असा प्रश्न सुनील मेश्राम या प्रवाशाने उपस्थित केला आहे. तर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रोज नागरिकांची परवड होत असल्याची प्रतिक्रिया सीमा मोहिते यांनी दिली.

याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, रस्ता वारंवार खराब होत असल्याने रस्त्याचा वरचा थर काढून त्यावर खडी पसरली जाणार आहे व त्यानंतर त्यावर डांबराचा थर पसरवला जाणार आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा पुन्हा खराब होणार नाही व व त्यासाठी ही दुरुस्ती केली जात असल्याचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले.