वसई: वसईतील माणिकपूर परिसरातील काही तरुणांनी दाखवलेल्या अद्भूत प्रसंगावधानामुळे एका चिमुरडीला जीवदान मिळाले आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली कोसळणाऱ्या एका ४ वर्षीय बालिकेला खाली उपस्थित असलेल्या तरुणांनी चादरीत झेलल्याने एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १५ जून रोजी संध्याकाळी ४:३० च्या सुमारास वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसरातील ‘आनंदविला’ इमारतीजवळ ही थरारक घटना घडली. या इमारतीत राहणारी ‘मीहा’ ही चार वर्षांची चिमुरडी गॅलरीतून खाली वाकून पाहत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती गॅलरीच्या ग्रीलला लटकू लागली.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि जीजी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या बबीथ वैजू याने सांगितले की, “त्यावेळी मी आणि माझे मित्र इमारतीच्या खाली उभे राहून बोलत होतो. अचानक आमचे लक्ष वर गेले आणि मीहा गॅलरीला लटकत असल्याचे आम्हाला दिसले. तिला वाचवण्यासाठी मी तातडीने तिच्या इमारतीच्या दिशेने धावलो. चौथ्या मजल्यावर पोहोचून मी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता.”
वर वेगाने धावलेल्या बबीतने वेळ न गमावता पुन्हा खाली धाव घेतली. त्याने तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीला तात्काळ घरातून जाड चादर आणण्यास सांगितले. त्यानंतर बबीत आणि मिथिल या दोन तरुणांनी ती चादर दोन्ही बाजूंनी अत्यंत घट्ट पकडून ठेवली. अवघ्या काही सेकंदांतच मीहाचा हात सुटला आणि ती थेट खाली कोसळली. मात्र, तरुणांनी दाखवलेल्या अचूक टायमिंगमुळे ती थेट चादरीत विसावली आणि तिचा जीव वाचला.
“मीहा खाली पडताच मी तिला तात्काळ पाठीवर उचलून नजीकच्या डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर तिच्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तिची प्रकृती आता स्थिर असून ती हळूहळू बरी होत आहे,” अशी माहिती बबीथ वैजू याने दिली. ऐनवेळी घाबरून न जाता बबीत, मिथिल आणि त्यांच्या मित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण वसई परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
