वसई: साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिवंगत लेखक व पत्रकार स्व.मनोज आचार्य यांच्या स्मृतींना उजाळा देणारे ‘माझ्या नजरेतून मनोज आचार्य’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी वसईत पार पडला. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या निवासस्थानी अतिशय घरगुती आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
बोरिवली येथील ‘नवचैतन्य प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन शरद मराठे यांनी केले आहे. मनोज आचार्य यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या लेखांचा यात समावेश आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मित्रपरिवाराने आणि सहकाऱ्यांनी अर्पण केलेली एक शब्दांजलीच आहे.
या सोहळ्याला ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, पुस्तकाचे संपादक प्रकाश कुलकर्णी, लेखिका प्रतिभा कणेकर, कवी सायमन मार्टिन, अंकुर आचार्य यांसह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मनोज आचार्य यांच्यासोबतच्या आठवणींना भावूक साद घातली.
“माझी आणि मनोजची ओळख २००७-०८ मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रॉबी डिसिल्वा यांच्यावरील पुस्तकाच्या लेखनात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ते केवळ लेखकच नाही तर उत्तम सुगरणही होते. महिलांच्या प्रति गैरवर्तन करणाऱ्यांना खडेबोल सुनावण्याचे धैर्य त्यांच्याकडे होते. धावपळीच्या आयुष्यात त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले, हीच एक मोठी खंत आहे.”मनोज आचार्य आज आपल्यात नसले, तरी या ‘अक्षर’ रूपाने आणि मित्रपरिवाराच्या आठवणींच्या रूपाने ते कायम आपल्या सोबत राहतील, अशा भावना ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केल्या.
“मनोज नेहमी म्हणायचे की, मला तुमच्याकडून काहीतरी मोठे लिहून घ्यायचे आहे, छोट्या गोष्टींत वेळ घालवू नका. त्यांच्या याच आग्रहामुळे मी चरित्र लेखनाकडे वळले. ज्यांच्या प्रेरणेने मी लिहायला घेतले, ते आज हे पुस्तक पाहायला आपल्यात नाहीत, याची खंत वाटते. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न आहे.” असे मत लेखिका प्रतिभा कणेकर यांनी व्यक्त केले.
‘मनोज लेखक, पत्रकार आणि शिक्षक तर होतेच, पण त्याही पलीकडे ते एक उत्तम माणूस होते. माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. या पुस्तकात त्यांनी लिहिलेले पाच लेखही समाविष्ट असून, त्यात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गाण्यांचा बारकावे त्यांनी मांडला आहे. असे संपादक प्रकाश कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले.
त्यानंतर पुढे बोलताना कवी सायमन मार्टिन यांनी त्यांच्या आठवणी जागविल्या “मनोजला जाऊन तीन वर्षे झाली असली, तरी ते कालपरवाच आपल्यात होते असे वाटते. ते कधीच धार्मिक चौकटीत अडकले नाहीत, त्यांचे वागणे नेहमीच सर्वसमावेशक राहिले. वसईच्या साहित्य चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या हयातीत जे कौतुक व्हायला हवे होते, ते राहून गेल्याची भावनाही अनेकांनी बोलून दाखवली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा पै परुळेकर यांनी केले.
