वसई: कृत्रिम फुले, तोरणे, नाजूक व नक्षीदार दागिने तसेच कारागिरांनी आकर्षक व रंगीबेरंगी चित्र काढून रंगवलेली लहान-मोठी मडकी अशा विविध प्रकारच्या साहित्याने सध्या वसईच्या बाजारपेठा फुलल्या आहेत. गोकुळाष्टमी व दहीहंडीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने वसईतील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

वसई-विरार शहरातील पारंपरिक बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या काळात नेहमीच एक वेगळे चैतन्य पाहायला मिळते. यावर्षी बालगोपाल आणि पूजापाठाच्या साहित्यासोबतच दहीहंडीसाठी लागणाऱ्या विशेष रंगीबेरंगी मडक्यांना मोठी मागणी आहे. गेल्या ७० वर्षांपासून मडकी घडवण्याचा व्यवसाय करणारे ज्येष्ठ कारागीर दामजी कुंभार यांनी सांगितले की, दिवाळी संपली की लगेचच पुढील सणांसाठी मडकी घडवण्याचे काम सुरू केले जाते.

सध्याच्या काळात पारंपरिक व्यवसाय नसलेले अनेक नवोदित व्यावसायिकही या क्षेत्रात उतरल्यामुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मडक्यांच्या सजावटीत नवीन प्रयोग केले जात आहेत. पूर्वी केवळ पांढऱ्या रंगावर साधी नक्षी काढली जायची; परंतु यावर्षी फॅब्रिक रंग, चमकणारे मणी, नक्षीदार लेस आणि विविध आकर्षक रंगांचा वापर करून मडकी सजवण्यात आली आहेत. ही कलाकुसर केलेली मडकी सध्या बाजारात आकारानुसार १०० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सर्व खर्च व वाढती स्पर्धा विचारात घेता या व्यवसायातून सुमारे २५ टक्के नफा मिळत असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वसईतील दहीहंडी पथकांनीही थरांचा सराव अंतिम टप्प्यात आणला आहे. शहरातील विविध चौकांत उंचच उंच हंड्या बांधण्याची तयारी आयोजकांकडून पूर्ण झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण बालगोपाळाचे कपडे, दागिने आणि पूजेच्या साहित्याची खरेदी करताना दिसत आहेत.