Medical Student Saves Life On Flight: गोवा-मुंबई विमान प्रवासादरम्यान एक प्रवासी अचानक बेशुद्ध झाल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. पण, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या वसईतील आर्यन लोलयेकर या विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. त्याच्या कामगिरीबाबत सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते असाच काहीसा प्रकार इंडिगोच्या विमानात घडला. ३ फेब्रुवारी रोजी गोवा येथील दाबोलीम विमानतळावरून दुपारी ३.५० वाजता इंडिगो एअरलाइन्सचे विमान मुंबईच्या दिशेने निघाले. पण, विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच विमानातील एका श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बघता बघता त्या प्रवाशाची प्रकृती खालावली आणि तो बेशुद्ध पडला. यामुळे विमानात एकच खळबळ उडाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानातील क्रू मेंबर्सनी “विमानात कोणी डॉक्टर आहे का?” अशी विचारपूस सुरू केली. एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या वसईतील आर्यन लोलयेकर याने पुढे येत त्या प्रवाशाची तपासणी केली. बेशुद्ध झालेल्या प्रवाशाच्या रक्तातील साखर कमी झाली होती. तसेच त्याच्या हृदयाचे ठोके कमी होत असल्यामुळे प्रवासी ग्लानीत गेला होता. विमान हजारो फूट उंचीवर असल्यामुळे प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पण, आर्यनने वेळ न दवडता बेशुद्ध झालेल्या प्रवाशाच्या प्रथमोपचार सुरू केले.
विमानात उपलब्ध असलेल्या आपत्कालीन ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला आणि काही वेळातच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर सुमारे ४५ मिनिटांच्या प्रवासानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. तिथे इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने रुग्णाला पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवले.
या कठीण प्रसंगी आर्यनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे विमानातील प्रवाशाचे प्राण वाचले. यामुळे इंडिगो एअरलाइन्स आणि विमानातील सर्व प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले. तसेच एक भावी डॉक्टर म्हणून त्याने आपले कर्तव्य चोख बजावले असल्यामुळे सर्व स्तरांतून आर्यनचे कौतुक होत आहे.
या प्रसंगाबाबत सांगताना “प्रवाशाची अवस्था पाहून क्षणभर भीती वाटली, पण वैद्यकीय शिक्षणाने मला धैर्य दिले. रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर परिस्थिती गंभीर झाली असती. एका जिवाचे प्राण वाचवू शकलो, याचे समाधान मोठे आहे,” अशी प्रतिक्रिया आर्यन लोलयेकर याने दिली आहे.

