वसई: वसई पश्चिमेकडील एका संकुलात अमानुष मारहाणीत मृत्यूशी झुंज देणारा चार वर्षीय चिमुकला विघ्नेश अखेर सुखरूप घरी परतला आहे. तब्बल दहा दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी संध्याकाळी त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विघ्नेश घरी परतल्याने त्याचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
३० मार्च २०२६ रोजी वसई पश्चिमेच्या ‘अनुपम संकुल’ सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. अतुल कोंढारे यांचा चार वर्षांचा मुलगा विघ्नेश याला सोसायटीत राहणाऱ्या संदीप पवार याने शुल्लक कारणावरून भीषण मारहाण केली होती. आरोपीने या चिमुकल्याचे डोके रिक्षावर आपटले आणि त्यानंतर त्याला उचलून जमिनीवर आपटत क्रूरतेचा कळस गाठला होता. या अमानुष मारहाणीचे सीसीटीव्ही चित्रण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. नागरिकांमधून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत होता.
या गंभीर मारहाणीत विघ्नेशच्या डोक्याला मोठी इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, डॉक्टरांचे विशेष पथक सातत्याने त्याच्यावर उपचार करत होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर विघ्नेशच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आणि बुधवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. विघ्नेश सुखरूप घरी परतल्याने त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून अद्यापही केली जात आहे.
सामाजिक मदतीचा हात
विघ्नेशच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च आला. या कठीण प्रसंगात लोकप्रतिनिधी आणि शासनाने मदतीचा हात दिला. मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपयांची मदत देण्यात आली, तर संबंधित रुग्णालयानेही बिलामध्ये २० टक्के सवलत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.
