नायगाव येथील एका बॅगेत सापडेलेल्या शाळकरी मुलीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. या १४ वर्षीय मुलीची हत्या तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने केल्याचे स्पष्ट झाले आहेत. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

शुक्रवार २६ ऑगस्ट रोजी नायगाव पश्चिमेच्या परेरा नगर परिसरातील उड्डाणपूलाच्या खाली असेलल्या झुडपात एका बॅगेत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होत्या. तिच्या पोटावर चाकूने १२ ते १५ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. बॅगेजवळच पोलिसांना एका शाळेचा बॅच सापडला होता. त्यावरून तिची ओळख पटविण्यात आली. ही मुलगी ९ वीत शिकत असून विलेपार्ले येथील एका शाळेत शिकते. गुरूवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तेव्हापासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

जुहू येथे हत्या करून ट्रेनमधून आणला मृतदेह
वसईच्या वालीव पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे. या मुलीची हत्या तिच्या २१ वर्षीय प्रियकराने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूवारी तिच्या प्रियकारने या मुलीला त्याच्या मित्राच्या जुहू येथील घरी आणले. त्या मित्राचे आई वडील कामाला गेले होते. घरात दोघांनी मिळून मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील ट्रॅव्हल बॅगेत भरला. या बॅगेत घरातून कपडे घेऊन मृतदेह झाकला होता. या दोघांनी बॅगेत भरलेला मृतदेह कोंबल्यानंतर ती बॅग घेऊन विरार लोकलने नायगाव येथे आणून टाकला होता. त्याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले आहे. हे दोन्ही आरोपी विरार येथून गुजराथला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले आहेत. या मुलीची हत्या जुहूच्या घरात झाली असून तिला घरात घेऊन जातान बघणारे काही प्रत्यक्षदर्शी आम्हाला मिळाले आहेत. या हत्येत दोघांचा सहभाग आहे. आम्ही आरोपीला लवकरच अटक करू अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल पाटील यांनी दिली.

तिच्या प्रियकारने नेमकी हत्या का केली ते त्याला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी देखील ही मुलगी त्याच्यासोबत एकदा पळून गेली होती अशी माहिती समोर आली आहे. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यांचा अहवाला आल्यानंतरच हत्या नेमकी किती वाजता झाली आणि तिच्यावर हत्येपूर्वी अत्याचार झाले होते का ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.