वसई:- सततच्या मुसळधार पावसामुळे वसई नवघर पूर्वेतील मिठागर परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. येथील शंभरहून अधिक घरे आणि सुमारे चारशे नागरिक पाण्याने वेढले गेले असून, नागरिकांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी कंबरेभर पाण्यातून तब्बल दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसई-विरार महापालिका स्थापन होऊन १६ वर्षे उलटली, तरीही या भागातील हीच बिकट अवस्था कायम असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वसई पूर्वेच्या नवघर जवळील भागात मिठागर वस्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात शेकडो कुटुंब वास्तव्यास आहेत.मागील पाच दिवसापासून वसई विरार भागात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे ​मिठागर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने तात्काळ धाव घेतली असून, बोटीच्या सहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंसाठी आणि मुख्य रस्त्या गाठण्यासाठी नागरिकांना कंबरेभर पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

​महापालिका स्थापन होऊन १६ वर्षे झाली, आम्ही दरवर्षी हाच नरक यातनांचा सामना करतोय. प्रशासनाला अजूनही यावर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

आरोग्य विभाग सतर्क

​पाण्याचा वेढा वाढल्याने परिसरात दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा आणि साथीच्या रोगांचा धोका प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिठागर परिसरातील नागरिकांना आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले आहे.​प्साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जात असून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.