वसई : महाराष्ट्र राज्य विधान मंडळाकडून विधिमंडळाच्या १५ आमदारांसाठी १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रशिक्षणासाठी लंडनचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरा आमदारांमध्ये वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचाही समावेश असून सोशल मीडियावर या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

लंडनमधील शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, प्रशासकीय कार्यपद्धती आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वर्जानेिक सेवांचा अभ्यास करण्यासाठी १५ आमदारांचा गट नियुक्त करण्यात आला आहे. हा अभ्यास दौरा एक अनौपचारिक प्रशिक्षण कार्यक्रम असून एका आठवड्याच्या या कार्यक्रमात ‘जागतिक नागरिकत्व’ (Global Citizenship) ही तत्त्वे आपल्या शासन, धोरण विकास आणि प्रशासकीय दृष्टिकोनात कशी बदल घडवून आणू शकतात, याचे सखोल मार्गदर्शन आमदारांना केले जाणार आहे.

​त्याचप्रमाणे वेस्टमिन्स्टर (Westminster), वेल्सची संसद (Senedd), यांचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी सर्व आमदारांना मिळणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान नेटवर्किंग आणि सहकार्याने काम करण्यावर भर दिला जाणार असून लंडन येथील नामवंत उद्योगपती, नागरी नेते, राजकारणी आणि धार्मिक नेत्यांसोबत १८ फेब्रुवारी व २० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वर्किंग डिनर’ आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी कार्डिफमधील वेल्स सरकारची संसद , वेस्टमिन्स्टर पॅलेस या यूके संसदेच्या (हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स) ऐतिहासिक ठिकाणी तसेच ‘बिग पिट’ आणि ‘सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी’ यांसारख्या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत अशी माहिती आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यलयातून देण्यात आली आहे.

या आमदारांचा समावेश

या अभ्यास दौऱ्यात भाजपकडून आमदार विक्रांत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार परिणय फुके, आमदार विक्रम पाचपुते, आमदार नमिता मुंदडा, आमदार अमित गोरखे, आमदार सुमित वानखेडे, आमदार योगेश टिळेकर सहभागी होणार आहेत. तर शिवसेनेकडून आमदार मनीषा कायंदे, राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे, शिवसेनेकडून (ठाकरे गट) आमदार वरुण सरदेसाई, काँग्रेसकडून आमदार विश्वजित कदम तसेच शेतकरी कामगार पक्षाकडून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा समावेश आहे.

नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

आमदारांच्या या दौऱ्यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचा दावा त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण, या दौऱ्यावर नेटकाऱ्यांकडून मात्र जोरदार टीका केली जात आहे. एका नेटकऱ्याने शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा अधोरेखित करत “सपाट रस्ते कसे बनवतात ते बघा आणि जमले तर ते महान कॉन्ट्रॅक्टर त्यांना पण घेऊन जा” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका नेटकाऱ्याने “आपल्या समस्या लंडनमध्ये जाऊन कशा सुटणार? हे तंत्रज्ञान एखाद्या संस्थेला सांगून इथेही पाहता आले असते. मग करदात्यांच्या पैशातून हा दौरा कशासाठी?”असा सवाल उपस्थित केला आहे. तर काहींनी “हा दौरा अभ्यास दौरा नसून पिकनिक असल्याची” टीका देखील केली आहे.