वसई: वसई तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अवास्तव येणारी वीजबिले आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीने त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नवघर (पूर्व) येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
अतिवृष्टीदरम्यान सलग अनेक दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे झालेले आर्थिक व मानसिक नुकसान, तसेच २११ कोटी रुपयांच्या भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचे रखडलेले काम या मुद्द्यांवरून मनसेने महावितरण प्रशासनाला जाब विचारला. १५ ऑगस्टपर्यंत ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवण्याचे अल्टीमेटम दिले असून, वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांनी दिला आहे.
या आंदोलनादरम्यान मनसेने स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवण्याची, वाढीव वीजबिलांची दुरुस्ती करण्याची, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्राहकांना भरपाई देण्याची आणि नियोजित वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देण्याची प्रमुख मागणी केली.
नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील यांनी दिला आहे. तर नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी नागरिकांच्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल केला.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी वीज प्रश्न व महावितरणचा भोंगळ कारभार याबाबत घोषणाबाजी केली. अधीक्षक अभियंता माणिक राठोड यांनी तक्रार निवारणासाठी लवकरच विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन कर्त्यांना आंदोलन मागे घेतले.
