वसई: गेल्या आठवडाभरापासून वसई तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे गाव-पाड्यातील शेतीकामांना वेग आला असून ५० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामुळे गेले कित्येक दिवस पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजालासुद्धा दिलासा मिळाला आहे.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. यासाठी महिन्यभरापूर्वी शेतकऱ्यांकडून पेरणीपूर्व तयारीला सुरुवात केली जाते. यात उन्हाळी मशागत, जमीन सपाट करणे व खत भरणे, बीजप्रक्रिया अशा विविध कामांचा समावेश असतो. तर यानंतर साधारण जून महिन्यात पेरणीला सुरुवात होते. मात्र, यंदा अलनिनोचा प्रभावामुळे पावसाळा लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यानंतर चौथ्या आठवड्यात पावसाने धरलेला जोर यामुळे तालुक्यातील पेरणीला जोर आला आहे.

तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ७२०० हेक्टर भात क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. या भात क्षेत्रात आतापर्यंत ५० ते ६० टक्के पेरणी करण्यात आली २५ दिवसांच्या कालावधीनंतर चिखलणी करून त्यांची लागवड केली जाते. तसेच सध्या तालुक्यातील पेरणीची कामे वेगाने सुरु असून या आठवडाभरात १०० टक्के पेरणी पूर्ण होईल. तर वसई तालुका हा कोकण किनारपट्टी परिसरात मोडत असल्यामुळे या भागात अगदी आठवडाभर झालेला पाऊसही शेतीसाठी अनुकूल ठरतो, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यभरपासून पेरणीपूर्व कामांची तयारी सुरु होती. शेतीची मशागत करून आणि बीजप्रक्रिया करून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. पण, गेल्या आठवड्याभरापासून सुरु झालेल्या पावसामुळे पेरणीला सुरुवात झाली आहे. अगदी बिनदिक्कतपणे शेतकरी शेतीची कामे करत आहेत, अशी प्रतिक्रिया पारोळ येथील शेतकरी नरेश पाटील यांनी दिली.

आधुनिक पद्धती आणि खताचा वापर

बदलत्या वातावरणाचा शेतीवर परिणाम होऊ नये. यासाठी तालुका कृषी विभागाकडून विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात गो-कृपा अमृतम् सेंद्रिय बॅक्टेरियल कल्चर वापरून रोगांपासून पिकाचा बचाव कसा करावा, तसेच यामुळे पिकाच्या वाढीवर काय परिणाम होतो याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच बायोचार म्हणजे झाडांचे तुकडे, पिकांचे अवशेष, पालापाचोळा किंवा शेण जाळून त्यापासून तयार करण्यात आलेल्या कोळशाच्या भुकटीचा वापर जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कसा करावा, तसेच एसआरटी पद्धतीने केली जाणारी शेती याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.