वसई: पालघर जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणां विरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी वसई पूर्वेच्या मोरीगाव येथे धडक कारवाई करीत तब्बल ५७४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

वसई पूर्वेच्या गाव मौजे मोरी येथील सर्व्हे क्रमांक १६/२/१, ३१, १७/३, ३७, १३/१/१, १३/१/२, १६/४/३, १३/२ आणि २९/३ या खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्वरूपाची रहिवासी, वाणिज्यिक व औद्योगिक बांधकामे झाल्याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र एसआयआर प्रक्रियेच्या कामात अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाई प्रलंबित होती. आता एस.आय.आर.च्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर महसूल प्रशासनाने प्रलंबित कारवाईस तातडीने सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५२(१) अन्वये दोषी आढळलेल्या खातेदारांना १४ ऑगस्ट २०२६ रोजी कलम ५३ अंतर्गत नोटिसा बजवण्यात आल्या होत्या. मालकी हक्काची कागदपत्रे आणि मंजूर बांधकाम परवानग्या सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र,दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली मोरी परिसरात मंगळवारी अनधिकृत बांधकाम कारवाई मोहीम हाती घेत ५७४ इतकी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोरी परिसरातील उर्वरित अनधिकृत बांधकामांवरही निष्कासनाची कारवाई सुरू असून, ती टप्प्याटप्प्याने आणि नियमानुसार पूर्ण करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोणत्याही शासकीय अथवा खाजगी जमिनीवर संबंधित सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करू नये. विकासकामे करताना लागू असलेले कायदे, मंजूर आराखडे आणि सक्षम प्राधिकरणाच्या परवानग्यांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार दीपक गायकवाड यांनी केले आहे.