वसई: ​सार्वजनिक वाहतुकीत पारदर्शकता आणि सुलभता आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ योजना सध्या वसईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनस्तापाचे कारण ठरत आहे. कार्डसाठी पैसे भरून महिना उलटला, तरी अद्याप कार्ड हाती न पडल्याने
ज्येष्ठ नागरिकांना रखरखत्या उन्हात वसई आगाराचे हेलपाटे मारावे लागत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेतील ढिसाळ नियोजनाबाबत ज्येष्ठ नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे. यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर इतरांना ५० टक्के सवलत दिली जाते. या कार्डसाठी १४९ ते २०० रुपये शुल्कही आकारण्यात आले आहे. मात्र, वसई बस आगारात ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

​अनेक ज्येष्ठ नागरिकांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक शुल्क भरून नोंदणी केली होती. १५ दिवसांत कार्ड देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, महिना उलटूनही अनेकांना कार्ड मिळालेले नाही. त्यातच, ३० एप्रिलपासून कार्ड वितरणासाठी नियुक्त केलेला ठेकेदार हा आगारात उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे.

१ मेपासून ‘मशीन बिघडले आहे’ असे जुजबी कारण पुढे करून कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची बोळवण केली जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दररोज २० ते २५ ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवासी आशेने आगारात येतात. मात्र, तासन्‌तास उन्हात ताटकळत उभे राहूनही कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने त्यांना निराश होऊन माघारी फिरावे लागते असे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश निकुंभ यांनी सांगितले आहे.ज्येष्ठ नागरिकांची होणारी फरफट थांबवून कार्ड वितरण सुरळीत करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

​”मी स्वतः २० एप्रिल रोजी १५० रुपये भरून नोंदणी केली होती. मला कार्ड तयार झाल्याचा संदेश आला आहे. मात्र, आगारात कार्ड देणारा ठेकेदारच उपलब्ध नसतो. चार ते पाच वेळा आगारात जाऊनही रिकाम्या हाताने परत यावे लागले.

  • सुरेश निकुंभ, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघटना (वसई)

नवीन ठेकेदार नियुक्त करणार

एनसीएमसी कार्ड या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र यासाठी जो ठेकेदार नियुक्त केला होता त्यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. आता नवीन ठेकेदार नियुक्त करून कार्ड वितरण सुरळीत केले जाणार असल्याची माहिती वसई आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे.