वसई: नालासोपारा उड्डाणपुलावरील टँकर अपघाताची दुर्घटना ताजी असतानाच, आता वसई पश्चिमेच्या गण नाका परिसरात महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने भरधाव वेगाने येत दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिवहन बस चालकाच्या बेदरकार चालण्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी नऊच्या सुमारास वसई पश्चिम ते भुईगाव मार्गावर परिवहन सेवेची बस प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस वसई पश्चिम येथील देव तलाव गण नाका येथे पोहोचली असता, समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला.
या अपघातात वाघोली येथे राहणारे दुचाकीस्वार विशाल सखाराम सांबरे ( ३१) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर प्रसंगावधान दाखवत बस चालक आणि वाहकाने जखमी विशाल सांबरे यांना तात्काळ उपचारासाठी वसई गावातील सरकारी रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या वेळी बसमध्ये २५ प्रवाशांसह अन्य ३ व्यक्ती प्रवास करत होत्या. सुदैवाने, या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.
दरम्यान, या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रशासनाने तत्परतेने कारवाई करत संबंधित बस चालकाला निलंबित केले आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर महापालिका परिवहन सेवेच्या बस चालकांच्या सततच्या बेदरकारपणावर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
