वसई: विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे शनिवारी, सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर ‘पिंडदान’ आंदोलन छेडले जाणार आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यामध्ये विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव व या वादग्रस्त कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी दिल्ली, मुंबईसह देशभर जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर वसईतील पारनाका येथील काँग्रेस भवनात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास वर्तक, प्रदेश सरचिटणीस दिनेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलासनाथ यादव यांच्यासह विविध घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दिल्लीत सुरू असलेल्या या संघर्षाची तीव्रता वाढवण्यासाठी संपूर्ण देशभर, जिल्हा, शहर व ब्लॉक स्तरावर सलग ६० दिवसांचा विशेष आंदोलन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यादरम्यान राष्ट्रीय पातळीपासून ते थेट प्रभाग/बूथ स्तरापर्यंत विविध उपक्रम हाती घेतले जातील. याच साखळी आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता नालासोपारा पूर्वेतील पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक ‘पिंडदान’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी यांनी दिली.

विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील सर्व त्रुटी तत्काळ दूर करणे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे आणि आगामी सर्व निवडणुका पारदर्शक पद्धतीने बॅलेट पेपरवर घेणे या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन उभारले जात आहे. हे आंदोलन केवळ राजकीय हेतूने प्रेरित नसून लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांच्या रक्षणासाठी असल्याने सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.