वसई:- वसईच्या नागले बंदरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपश्यावर महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली आहे. या कारवाईत १२ ब्रास वाळू सह २ डंपर जप्त केले आहेत.
वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या खाडी पात्रात बेकायदेशीर पणे सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळू उपसा केला जाऊ लागला आहे. विशेषतः वैतरणा खाडी,शिरगाव, जुली बेट, खानिवडे, पाचूबंदर, नागला बंदर या भागात छुप्या मार्गाने वाळू उपसा होत असतो.याचा मोठा परिणाम पर्यावरण यासह बाजूच्या किनारपट्टीला बसू लागला आहे. अशा वाळू उपसा रोखण्यासाठी शासन स्तरांवर विविध सामाजिक संघटना यांनी अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या जात आहे. त्याच अनुषंगाने अधूनमधून महसूल विभागाकडून कारवाई केल्या जात आहे.
नुकताच वसईच्या नागला बंदर भागात छुप्या मार्गाने वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली होती. याच अनुषंगाने वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड, निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते व मंडळ अधिकारी अरुण मुर्तडक व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री आठच्या सुमारास धाड टाकली. यावेळी बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारवाईत सुमारे १२ ब्रास वाळू व २ हायवा डंपर असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही वाळू त्या ठिकाणी ढिगारे तयार करून नंतर प्लास्टिक गोणीत भरून छुप्या मार्गाने मुंबईत विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
