वसई :- नायगाव पूर्वेच्या चिंचोटी येथील भागात एका ३० वर्षीय तरुणाचा खदानीच्या साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवकुमार गुल्लु गुप्ता असे मयताचे नाव असून तो अंघोळ करण्यासाठी खदानीत उतरला असता ही दुर्घटना घडली.

शिवकुमार गुप्ता हा चिंचोटी येथील परिसरात राहतो. २ एप्रिलला दुपारी चिंचोटी येथील खदानीत अंघोळ करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. काही वेळाने याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना मिळताच त्यांनी नायगाव पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. मात्र दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शिवकुमार याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे शोध मोहीम थांबवली होती. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह हा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसून आला. पोलिसांनी तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वसई विरार शहरात खदानीच्या बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

खदानीत बुडून मृत्यू झालेल्या घटना

  • ४ मार्च २०२६ : वसई पूर्वेच्या राजवळी येथील खदाणीत बुडून १५ वर्षीय आयान मनिहार या मुलाचा मृत्यू झाला होता.
  • ४ मार्च २०२६ : विरार पूर्वेच्या मांडवी येथील जाधवपाडा येथील खदाणीत खेळायला गेलेल्या १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
  • १४ जानेवारी २०२६ : मकर संक्रांतीच्या दिवशी जोगेश्वरीहून विरारला नातेवाईकांकडे आलेल्या विनायक सितप (४८) आणि त्यांची मुलगी ईकांशा सितप (१५) यांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला. पोहताना वडिलांना वाचवण्यासाठी गेलेली मुलगीही पाण्यात बुडाली होती.