वसई: वसई विरार शहरातील बंद अवस्थेत असलेल्या खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.नुकताच नायगाव पूर्वेच्या  बापाणे परिसरातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह चिंचोटी जवळील खदाणीच्या पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रूकसार हबिउल्ला खान असे मृत मुलीचे नाव असून, पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व येथील आशानगर बापाणे परिसरात राहणारी ही बारा वर्षीय मुलगी राहत होती. ही मुलगी  २८ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास आपल्या मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नव्हती.

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास  सुमारास चिंचोटी जवळील एका खदाणीच्या पाण्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. स्थानीकांनी याची माहिती तातडीने नायगाव पोलिसांना दिली माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीचा खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्याने लहान मुलं आता विविध ठिकाणी खेळण्यास जात आहेत. मात्र खदाणीत किंवा पाण्याच्या साठ्याजवळ व धोकादायक ठिकाणी जाऊ नये. त्याकडे त्यांच्या पालकांनी ही लक्ष द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सातत्याने खदाणीच्या  पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्या खदानी आहेत अशा ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात अशी मागणी ही आता जोर धरत आहे.

या पूर्वीच्या घटना

४ मार्च २०२६ वसई पूर्वेच्या राजावळी येथील खदाणीत बुडून १५ वर्षीय आयान मनिहार या मुलाचा मृत्यू झाला होता.

४ मार्च २०२६ विरार पूर्वेच्या मांडवी येथील जाधवपाडा येथील खदाणीत खेळायला गेलेल्या १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

२० फेब्रुवारी २०२६ रोजी विरार पश्चिमेच्या बोळींज येथील तलावात अर्णव पाटील या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांतीच्या दिवशी जोगेश्वरीहून विरारला नातेवाईकांकडे आलेल्या विनायक सितप (४८) आणि त्यांची मुलगी ईकांशा सितप (१५) यांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला. पोहताना वडिलांना वाचवण्यासाठी गेलेली मुलगीही पाण्यात बुडाली होती.