वसई: बदलापूर येथील एका शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. अशा घटना शाळेत व महाविद्यालयात घडू नये यासाठी नायगाव पोलिसांनी बुधवारी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या विद्यालयातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयीच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
बदलापूर येथील शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय स्तरावरून उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी नायगाव पोलिसांनी मुख्याध्यापक यांची तातडीने बैठक घेतली. यात
सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मुलींच्या स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, विशाखा समिती स्थापन करणे, शाळेतील कर्मचारी यांचे चरित्र पडताळणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच शाळेतील बसवरील वाहक व चालक यांचेही चारित्र्य पडताळणी करण्याबाबत सूचना देऊन शक्यतो महिला वाहकाची नेमणूक करावी, तक्रार पेटी ठेवणे, मुलांचे समुपदेशन करणे अशा सूचना नायगाव पोलिसांनी केल्या आहेत.
सहायक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक सागर टिळेकर, मंगेश अंधारे, सहायक पोलीस निरीक्षक बलराम पालकर, पोलीस हवालदार प्रकाश आवारे यासह ३५ ते ४० शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
हेही वाचा – वसई : शाळा महाविद्यालयांची उदासीनता, तक्रार पेट्या बसविण्याचा निर्णय कागदावरच
बदलापूर सारखी दुर्घटना अन्य शाळेत घडू नये यासाठी नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापक यांची बैठक घेतली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. – रमेश भामे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नायगाव पोलीस ठाणे</p>