वसई: ‘मानवतेचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताने जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले,’ अशा भावना व्यक्त करत वसई-विरार शहरात शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’ अत्यंत साधेपणाने आणि भक्तीभावात पाळण्यात आला. वसईतील ऐतिहासिक चर्चेसमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येशूच्या बलिदानाचे स्मरण केले.
वसई, विरार, नालासोपारा आणि आगाशी परिसरातील चर्चेसमध्ये सकाळपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवल्याच्या घटनेचे स्मरण करण्यासाठी अनेक ठिकाणी क्रूसाची वाट’ (वे ऑफ द क्रॉस) आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी येशूच्या जीवनातील अखेरच्या क्षणांचे आणि त्यांच्या त्यागाचे वाचन करण्यात आले. दुपारच्या वेळी मुख्य प्रार्थना सभा पार पडल्या, ज्यात भाविकांनी येशूच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली.
गुड फ्रायडे हा दिवस दरवर्षी वसंत ऋतूतील पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी पाळला जातो. याच कारणामुळे दरवर्षी या दिवसाची तारीख बदलत असते. यावर्षी ३ एप्रिल रोजी हा दिवस आला असून, ईस्टर संडेच्या दोन दिवस आधी हा शोक दिवस पाळण्याची परंपरा वसईतील ख्रिस्ती समाजाने यंदाही श्रद्धेने जोपासली. इसवी सन ३० च्या दशकात येशूला अटक करून क्रूसावर चढवण्यात आले होते. तोच वार शुक्रवार असल्याने, हा दिवस येशूच्या स्मरणात व्यतीत करण्यात आला. या दिवशी उपवास धरून आणि शांतता राखून ख्रिस्ती बांधवांनी येशूच्या शिकवणीचा जागर केला.
“येशू ख्रिस्ताचे बलिदान हे केवळ दुःखाचे प्रतीक नसून ते मानवजातीप्रती असलेल्या अथांग प्रेमाचे आणि क्षमेचे निदर्शन आहे. क्रूसावरील वेदना सहन करत असतानाही त्यांनी ‘पित्या, यांना क्षमा कर’ असे म्हणून जगाला शांततेचा मार्ग दाखवला. आजच्या हिंसेच्या युगात येशूचा हा त्यागाचा संदेश मानवी क्रूरतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी अधिक समर्पक ठरतो,” अशी प्रतिक्रिया संत मायकल चर्चचे फादर असिस रॉड्रिग्ज यांनी दिली.
वसईतील माणिकपूर, गास, नंदाखाल, नानभाट, होळी, पापडी आणि पाचूबंदर सारख्या भागात सायंकाळच्या सुमारास शोक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यावेळी संपूर्ण परिसरात शांतता आणि भक्तीचे वातावरण दिसून आले.
