वसई: गुड फ्रायडे निमित्त सकाळी प्रार्थना साठी गेलेल्या भाविकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसई पश्चिमेच्या रानशेत गावातील दया माता चर्च परिसरात ही घटना घडली असून यात एका मुलीसह ७ ते ८ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास गुड फ्रायडेच्या सणाच्या निमित्ताने ख्रिस्तीबांधव रानशेत येथील दया माता चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आले होते. प्रार्थना झाल्यानंतर बाहेर पडत असतानाचा एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी दोन नागरिक धावत गेले असता त्यांनाही चावा घेतला.
. याशिवाय त्यानंतर ४ ते ५ जणांना चावा घेत जखमी केले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेला दिली असता श्वान पथकाने घटनास्थळी जाऊन पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद केले आहे.कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्व जखमींना तत्काळ महापालिकेच्या डी.एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून आवश्यक इंजेक्शन देण्यात आली असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
यापूर्वी सुद्धा विरार पूर्वेच्या भागात पिसाळलेल्या कुत्र्याने तीन जणांना चावा घेतला होता. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
