वसई: राज्य शासनाने मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीनंतर मराठी भाषा शिकलेल्या व न शिकलेल्या रिक्षा चालकांमधील फरक प्रवाशांना कळावा यासाठी रिक्षांवर मराठी अस्मितेचा संदेश देणाऱ्या तसेच “हो मी मराठी शिकलो, मी मराठी बोलतो” असा संदेश असणाऱ्या पाट्या लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनाने अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य केले आहे. यासाठी सुरुवातीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतही देण्यात आली होती. तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आले. पालघर जिल्ह्यातही रिक्षाचालकांसाठी तालुकानिहाय प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली होती. या शिबिरातून मराठी भाषेचे जुजबी ज्ञान प्राप्त करत तब्बल ११ हजार ६४० अमराठी रिक्षाचालकांनी प्रशिक्षण पूर्ण केले व परिवहन विभागाकडून प्रशिक्षण केल्याचे प्रमाणपत्र मिळवले.

मात्र, प्रशिक्षण घेऊनही अनुत्तीर्ण ठरलेल्या व ज्यांना प्रशिक्षण घेता आले नाही अशा रिक्षा चालकांनी १५ ऑगस्टपर्यंतच्या मुदतीची अट शिथिल करून मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली होती. काही ठिकाणी यासाठी रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रवाशांच्या रिक्षा अडविण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी शासनाकडून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकणे अनिवार्य आहे.

मात्र, प्रवाशांना मराठी भाषा शिकलेले रिक्षाचालक ओळखता यावेत व प्रवाशांनी त्यांच्या रिक्षातून प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे यासाठी, रिक्षाचालक “हो मी मराठी शिकलो, मी मराठी बोलतो” असा संदेश देणाऱ्या पाट्या रिक्षांवर दर्शनी भागात लावत असल्याचे दिसून येत आहे. मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही. मात्र, मी दिलेल्या मुदतीत मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, हे प्रवाशांना कळावे यासाठी ही पाटी लावत असल्याचे वसई येथील रिक्षाचालकाने सांगितले.

यापूर्वी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागांनी घेतल्यानंतर अमराठी रिक्षाचालकांनी त्याला विरोध केला होता. तर त्यांच्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून, मनसेच्या पक्षाकडून मराठी भाषा बोलता येणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांवर मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा, असा संदेश असणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या होत्या.