वसई: प्रतीक्षा फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ओणम महोत्सव २०२६’ व सन्मान सोहळ्याचे आयोजन
करण्यात आले आहे. सामाजिक सलोखा, सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीय परंपरेचा संगम असणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या २५ वर्षांपासून वसईमध्ये सातत्याने केले जात आहे. तर केरळचे राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांची प्रमुख उपस्थिती ही यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

वसईतील स्टेला परिसरातील अय्यापा मंदिर सभामंडप येथे रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ओणम महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केरळचे राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार डॉ. हेमंत सावरा, केरळ विधानसभेचे आमदार बी. बी. गोपकुमार, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे-पंडीत, आमदार राजेंद्र गावित, विरोधी पक्षनेते मनोज पाटील तसेच गटनेते अशोक शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमानिमित्त प्रतीक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा केरळ प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक उत्तम कुमार यांनी नुकतीच केरळमधील राजभवनात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आरलेकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ओणम महोत्सव २०२६च्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना, “ओणम हा केवळ केरळचा सण नसून भारतीय संस्कृतीतील समता, बंधुभाव आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात वसईसारख्या ठिकाणी इतक्या सातत्याने हा महोत्सव साजरा होत असल्याचा आनंद आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यास मी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल राजेंद्र आरलेकर यांनी दिली.

तर, “गेल्या २५ वर्षांपासून वसईत ओणम महोत्सव आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र आणि केरळ या दोन संस्कृतींमधील मैत्री अधिक दृढ करणे. विविध भाषा, धर्म आणि संस्कृतीतील नागरिकांना एका व्यासपीठावर आणून सामाजिक ऐक्याचा संदेश देणे, हीच प्रतीक्षा फाउंडेशनची परंपरा आहे. राज्यपालांनी आमंत्रण स्वीकारून उपस्थित राहण्याची तयारी दर्शविल्याने आमच्या कार्याला मोठी प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया उत्तम कुमार यांनी दिली.

कार्यक्रमात मान्यवरांचे पारंपरिक स्वागत, विविध सांस्कृतिक सादरीकरणे, प्रतीक्षा फाउंडेशनचा सन्मान सोहळा तसेच पारंपरिक ओणसध्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, केरळी समाजबांधव आणि वसई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.