वसई: वसई पश्चिमेतील पाचूबंदर येथील कचराभूमीला टाळे ठोकल्यानंतरही अज्ञात व्यक्ती भिंत ओलांडून कचराभूमीची अनधिकृत प्रवेश करत विजेच्या तारांना आग लावत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. वीजवाहिन्यांमधील धातूच्या तारा काढून त्यांची विक्री करण्यासाठी हे प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वसई पश्चिमेला पाचूबंदर रोडजवळ जुनी कचराभूमी आहे. शहरातून गोळा केला जाणारा ओला कचरा व मुख्यत्वे झाडांच्या छाटणीदरम्यान गोळा होणारा पालापाचोळा, शेतीविषयक कामे करणाऱ्या नागरिकांच्या आवारात गोळा होणारा हरित कचरा एका ठिकाणी गोळा करता यावा, म्हणून पावसाळ्यात बंद असणारी ही कचराभूमी सुरू करण्यात आली होती.

मात्र, ओल्या कचऱ्याच्या व्यतिरिक्त इतर कचराही या ठिकाणी गोळा करून त्याला आग लावली जात असल्यामुळे ग्रामस्थांना दुर्गंधी व विषारी धुराचा सामना करावा लागत होता. तसेच कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढल्यामुळे नागरिकांना लहान-मोठे अपघात व वाहतूककोंडी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पालिकेकडे ही कचराभूमी बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात पालिकेने या कचराभूमीला टाळे ठोकले.

मात्र, पाचूबंदर रोडवरील नाल्याला लागून असणारी कचराभूमीची भिंत ओलांडून या ठिकाणी गर्दुल्ले व भंगार विक्रेत्यांकडून अनधिकृत प्रवेश केला जात असल्याची तक्रार राजेश हेट्या यांनी केली आहे. विजेच्या तारा जाळून त्यातील धातूच्या तारा बाहेर काढून त्याची विक्री भंगार विक्रेत्यांना करता यावी, म्हणून या आगी लावल्या जात असल्याची तक्रार हेट्या यांनी केली आहे. तसेच अवैधरित्या कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांशी संवाद साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.