वसई: वसई-विरार महापालिकेकडून पाचूबंदर स्मशानभूमीत बसवण्यात आलेल्या शवपेट्या विजेअभावी बंद आहेत. त्या सुरू व्हाव्यात यासाठी स्वतंत्र रोहित्र बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, रोहित्र मंजुरीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने या शवपेट्या कार्यान्वित होण्यास अजून काही काळ लागणार आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पार्थिव काही काळासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रामुख्याने शवपेटी वापरली जाते. अंत्यसंस्कारासाठी विलंब होणार असल्यास किंवा शवविच्छेदन, पोलीस तपास व इतर कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत मृतदेह सांभाळून ठेवण्यासाठी याची गरज भासते. मात्र, वसई-विरार शहरात पुरेशा शवपेट्या नसल्यामुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयांतील शवपेट्यांवर अवलंबून राहावे लागत होते.

या समस्येवर मात करण्यासाठी पालिकेकडून विविध ठिकाणी शवपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या. सद्यस्थितीत वसई-विरार महापालिका क्षेत्रात एकूण ५१ शवपेट्या आहेत. यापैकी काही महापालिकेच्या, तर काही ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारात आहेत. पाचूबंदर येथे लाखोंचा खर्च करून काही वर्षांपूर्वी २१ शवपेट्या बसवण्यात आल्या होत्या. या सर्व शवपेट्या सुरळीत चालण्यासाठी त्यांना पुरेसा वीजपुरवठा होणे आवश्यक आहे.

सुरुवातीला पाचूबंदर येथील शवपेट्यांना कोळीवाड्यात पुरवल्या जाणाऱ्या रोहित्रामधूनच वीजजोडणी देण्यात आली होती. मात्र, शवपेट्यांसाठी लागणारा ५० केव्हीचा वीजपुरवठा आणि रोहित्राची अपुरी क्षमता यामुळे या शवपेट्या सतत बंद पडत होत्या. त्यामुळे त्या खराब होऊ नयेत यासाठी अखेर बंद ठेवाव्या लागल्या. पण, त्या पुन्हा सुरू करता याव्यात यासाठी स्वतंत्र रोहित्राची मागणी महावितरणकडे करण्यात आल्याची माहिती सर डी. एम. पेटिट रुग्णालयाच्या डॉक्टर राणी बदलानी यांनी दिली आहे.

याबाबत महावितरणशी संपर्क साधला असता, महापालिकेकडून आवश्यक असणारे पत्र मिळाले नसल्यामुळे ही प्रक्रिया काही काळ खोळंबली होती, असे सांगण्यात आले. मात्र, ते पत्र आता प्राप्त झाले असून गेल्याच आठवड्यात रोहित्रासाठीचा प्रस्ताव वसई मंडळ कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. बंद शवपेट्या आहेत त्यांच्या विद्युत संबंधित ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

शवपेट्यांची संख्या

विराटनगर – १७
पाचूबंदर – २१
नालासोपारा – ९
नवघर – ४