लोकसत्ता प्रतिनिधी
वसई:- सप्टेंबर महिन्यातील पावसाची प्रदीर्घ उघडीप आणि ऑक्टोबरच्या वाढत्या उन्हाची तीव्रता यामुळे वसई तालुक्यातील भातशेती गंभीर संकटात सापडली आहे. भातपीक दाणे भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतातील उभे पीक हातचे जाऊ नये, यासाठी उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा शोध घेत विहिरी, डबके आणि ओहोळांतून डिझेल-पेट्रोल इंजिनच्या साहाय्याने अथवा चारी खोदून शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
वसई तालुक्यात यंदा सुमारे ५ ते ७ हजार हेक्टर क्षेत्रावर हळवे, निमगरवे आणि गरवे या वाणांची लागवड करण्यात आली आहे. सध्या हळवे भात दाणे भरण्याच्या अंतिम टप्प्यात असून १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान कापणी अपेक्षित आहे. दुसरीकडे निमगरवे आणि गरवे भात फुलोरा व दाणे भरण्याच्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत आहे. या निर्णायक काळात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने भाताची भर, वजनावर आणि एकंदर उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा पावसाचे आगमन लांबल्याने सुरुवातीपासूनच शेतीची गणितं बिघडली होती. त्यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीला पूरस्थिती जन्य पाऊस झाला. मात्र त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली. पावसातील या मोठ्या तुटीमुळे आणि ऑक्टोबरमधील कडक उन्हामुळे शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सखल भागात काही प्रमाणात पाणी असले, तरी वरकस जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे कापणीच्या तोंडावर उभे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदा आतापर्यंत पीक उत्तम होते, मात्र यापुढील दिवसांत पाणी मिळाले नाही, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल अशी भीती महिला शेतकरी आशालता कुडू यांनी व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची चर्चा सुरू असताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने ग्रामीण भागात असंतोष आहे. पावसात पडलेला प्रदीर्घ खंड आणि उष्णतेचा तडाखा यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने पालघर जिल्ह्यातील परिस्थितीचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन तातडीने योग्य ती मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
