वसई: खरीप हंगामाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या मृग नक्षत्राचा कालावधी संपत आला, तरी वसई तालुक्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी, दरवर्षी या काळात असणारी भात पेरणीची लगबग यंदा पूर्णपणे थंडावली असून, तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन अजूनही कोरडीच आहे. पाऊस लांबल्यामुळे भातशेतीचा संपूर्ण हंगामच उशिरा सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी वर्गाची चिंता कमालीची वाढली आहे.

​यंदा मान्सूनचा प्रवास विस्कळीत होण्याची चिन्हे असल्याने, पुरेशा पावसाशिवाय पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभाग आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर नेमके काय करावे, अशा संभ्रमात शेतकरी सापडला आहे. ​वसई तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने पारंपरिक तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची मशागत पूर्ण केली आहे. काही भागांत सुक्या उखळण्या करण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, मातीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने शेतात बियाणे टाकण्याचे धाडस शेतकरी करत नाहीत. अशा स्थितीत पाऊस अधिक लांबल्यास, पुन्हा एकदा मशागत करावी लागण्याची भीती व्यक्त होत असून, यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विनाकारण वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

दरवर्षी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अखेर पर्यँत पाऊस सुरू होत असतो. त्यानुसार शेतीकामांचे नियोजन केले जाते. यावर्षी मात्र जून महिना निम्म्यावर आला तरी पाऊस नाही त्यामुळे यंदाचा हंगाम अडचणीची ठरण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

​आर्थिक संकट आणखीन गडद

​यंदाच्या हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके आणि डिझेलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीचा प्राथमिक खर्च आधीच वाढलेला असताना, पावसाच्या विलंबाने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद केले आहे. पावसाचा ठोस अंदाज नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची खरेदी लांबवणीवर टाकली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून, कृषी सेवा केंद्रांमधील व्यवहार कमालीचे मंदावले आहेत. दमदार पाऊस झाल्याशिवाय बाजारात गजबज निर्माण होणार नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

​’अल निनो’चे सावट

​वसई तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. मृग नक्षत्रात पेरणी आणि त्यानंतर येणाऱ्या नक्षत्रात लावणी, असे हे वर्षानुवर्षांचे गणित आहे. मात्र, जून महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी पावसाचा मागमूस नसल्याने हे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच यंदा ‘अल निनो’चे संकट घोंगावत असल्याने पर्जन्यमान कमी होऊन त्याचा ही परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे.

​या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने केवळ आवाहने न करता, बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना नेमकी कोणती पिके घ्यावीत किंवा पेरणी कधी करावी, याचे योग्य आणि तातडीचे मार्गदर्शन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.