वसई :- औषधांची मुदत संपल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. अशातच वसईच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेरच कालबाह्य झालेल्या औषधांचा साठा टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वसई पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच लहान मुलांना दिले जाणारे पी डी डोम नावाचे औषधांच्या बाटल्या या कचऱ्यात फेकून दिल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये या औषधांची मुदत संपली असून ती कचऱ्यात टाकून दिली आहेत.

विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा औषधांचा तुटवडा जाणवत असताना मोठ्या प्रमाणात औषधे अशा प्रकारे वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गटाराशेजारी पडून असलेल्या या औषधांमुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

मुदतबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट का लावण्यात आली नाही, ती उघड्यावर फेकण्यास जबाबदार कोण आणि संबंधितांवर कारवाई होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यापूर्वी सुद्धा भंगारात औषध साठा सलाईनच्या बाटल्या आढळून आल्या होत्या.