वसई: वसई पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, सफाई कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, अपुरा पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी अडचण झाली आहे. तर दुसरीकडे पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच वाहनांची पार्किंग केली जात असल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वसई पश्चिमेत तहसील कार्यालयासमोर वसई पंचायत समितीचे कार्यालय आहे. पण, कार्यालयाला गेलेले तडे, जीर्ण झालेले बांधकाम यामुळे इमारतीला धोकादायक घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पंचायत समितीतील विविध आस्थापनांना मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असणाऱ्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. पण, कार्यालयांमधील जागेची कमतरता, आणि सुविधांचा अभाव यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
तसेच या कार्यालयात स्वच्छतागृहाची योग्य सोय नसल्यामुळे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. यासाठी चालू वर्षात जुलै ते सप्टेंबरदरम्यान पंचायत समिती कार्यालयाच्या मागच्या बाजूस चार नवी स्वच्छतागृहे उभारण्यात आली. मात्र, नव्याने उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचीही अवघ्या काही महिन्यातच दुरावस्था झाली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचा असलेला अभाव, तसेच अपुरा पाणीपुरवठा यामुळे स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याचा वापर करणे कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. कर्मचाऱ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन, लवकरच सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतागृहांची नियमित सफाई करून घेतली जाईल, असे वसई पंचायत समिती गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत यांनी सांगितले आहे.
नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सोय नाही
एकीकडे कर्मचाऱ्यांसाठी पंचायत समितीत उपलब्ध असणाऱ्या स्वच्छतागृहांची दुरावस्था झालेली असताना दुसरीकडे विविध प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सोय नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालय किंवा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे.
प्रवेशद्वारावरच वाहनांची अनधिकृत पार्किंग
गेल्या काही महिन्यांपासून पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये चारचाकी, दुचाकी वाहनांसह रिक्षाचालक आपली वाहने प्रवेशद्वाराला लागून उभी करतात. यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वारातून ये-जा करताना मोठी गैरसोय होते. इतकेच नाही, तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही आपली वाहने आत-बाहेर काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, पंचायत समितीचे प्रवेशद्वार मोकळे करून अडथळा ठरणारी ही वाहने तातडीने बाजूला करावीत आणि अशा अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
