वसई: वसई पश्चिमेच्या भागातील पापडी राम तलावाच्या देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने तलावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. विशेषतः तलावाला जलपर्णी मोठा विळखा बसला होता. रविवारी संत निरंकारी वसई मंडळाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वच्छता मोहीम राबवित तलावातील जलपर्णी काढण्याचे काम केले. निम्म्याहून अधिक जलपर्णी त्यांनी या मोहिमेत तलावातून बाहेर काढली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून जलपर्णीच्या विळख्यात अडकलेला पापडी तलावाने आता मोकळा श्वास घेतला
वसई पश्चिमेच्या भागात अनेक वर्षे जुने पापडी तलाव आहे. या तलावाचे पालिकेने सुशोभिकरण केले होते. त्यामुळे दररोज सकाळ व संध्याकाळच्या सुमारास या भागात नागरिक व लहान मुलं ही फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र सध्या स्थितीत या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने या तलावाचा परिसर हा बकाल बनू लागला आहे. या तलाव परिसरात दैनंदिन स्वच्छता होणे गरजेचे आहे. तसे होत नाही त्यामुळे याभागात प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांची आवरणे व इतर कचऱ्याचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे. त्यामुळे तलावाच्या सभोवताली अस्वच्छता पसरली होती.
तर दुसरीकडे तलावात जागोजागी मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे जाळे पसरले आहे. आता हळूहळू संपूर्ण तलावाला जलपर्णीचा वेढा बसू लागला असल्याने तलाव ही विद्रुप दिसू लागले होते. याबाबत येथील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी सुध्दा केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते त्यामुळे ही समस्या अधिक जटील बनली होती असे सामाजिक कार्यकर्ते गौरज पाटील यांनी सांगितले. या जलपर्णीच्या विळख्यामुळे तलावात असलेल्या मत्स्य प्रजातींवर परिणाम होत होता तर दुसरीकडे तलावातील पाणी ही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे चित्र दिसून आले होते.
रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून वसई विरार महापालिकेचे कर्मचारी व संत निरंकारी मंडळ वसई शाखेचे सदस्य यांच्या मार्फत तलावाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यात तलावात असलेली जलपर्णी काढण्यात आली. आतापर्यँत मोठ्या प्रमाणात जलपर्णी बाहेर काढून तलाव मोकळे करण्यात आले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे.
